पुणे – सनी स्पोर्टस किंग्डम, सोमेश्वर फाउंडेशन आणि क्रीडा जागृती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित योनेक्स सनराईज माजी आमदार कै. विनायक निम्हण स्मृती जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत जतीन सराफ, कायरा रैना, समीहन देशपांडे, श्रावणी आर्डे, विहान मूर्ती, सफा शेख, आदित्य पाटील, प्राजक्ता गायकवाड, आयुश कमल यांनी विजेतेपद संपादन केले.
या स्पर्धेत अंतिम फेरीत 11 वर्षांखालील मुलांच्या गटात जतीन सराफने अतिक्ष अग्रवालचा 15-8, 15-11 असा पराभव करून विजेतेपद मिळविले. तर मुलींच्या गटात कायरा रैनाने दिविशा सिंगचा 15-11, 15-6 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. 13 वर्षांखालील मुलांच्या गटात समीहन देशपांडेने रेयाश चौधरीचा 15-11, 16-14 असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. तर मुलींच्या गटात श्रावणी आर्डे हिने सान्वी पाटीलचा 15-7, 10-15, 15-6 असा पराभव करून विजेतेपद मिळविले.
15 वर्षांखालील मुलांच्या गटात अंतिम लढतीत विहान मूर्तीने वरद लांडगेचा 15-10, 15-8 असा तर, मुलींच्या गटात सफा शेखने संस्कृती जोशीचा 17-15, 15-10 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. 17 वर्षांखालील मुलांच्या गटात आदित्य पाटील याने चैतन्य परांडेकरचा 15-9, 15-11 असा तर, मुलींच्या गटात प्राजक्ता गायकवाड हिने पूर्वा वळवंडेचा 15-12, 15-4 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.19 वर्षांखालील मुलांच्या गटात आयुश कमलने दिव्यांश सिंगचा 10-15, 15-7, 15-5 असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपदावर आपले नाव कोरले.
दुहेरीत अंतिम लढतीत 15 वर्षांखालील मिश्र गटात ईशान लागूने आयुशी काळेच्या साथीत आदित्य पोतनीस व श्रुतिका ढवळे यांचा 15-7 15-13 असा पराभव करून विजेतेपद मिळविले. दुहेरीत अंतिम फेरीत 13 वर्षांखालील मुलांच्या गटात आयुश अग्रवालने जतीन सराफच्या साथीत रिहान हंसदा व रुपांश दास यांचा 15-6, 15-12 असा तर, मुलींच्या गटात रुद्रानीराजे निंबाळकर व तेजस्वी भुतडा यांनी नाविका जैन व श्रावणी आर्डे यांचा 16-14, 13-15, 15-6 असा पराभव करून विजेतेपद मिळविले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण सनीज वर्ल्डच्या संचालिका मधुरा निम्हण, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष प्रताप जाधव आणि झेनेटिक स्पोर्टसचे संचालक नरेंद्र पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अभिजित मोहिते उपस्थित होते.