मुंबई: कोविड-19 च्या प्रादुर्भावाला सामोरे जाण्यासाठी सर्व व्यग्र असताना गृह विभागाने सहआयुक्त (कायदा व सुव्यस्था) विनय चोबे यांची अप्पर महासंचालक म्हणून पदोन्नती केली आहे. सध्या तेच पद तात्पुरता स्वरूपात पदोन्नती देऊन त्यांना तेथेच बढती देण्यात आलेली आहे. चोबे गेल्या 9 एप्रिलपासून मुंबईच्या कायदा व सुव्यवस्थेची धुरा सांभाळीत आहेत. गृह विभागाने त्यांच्या बढतीचे आदेश जारी केले.
चोबे मूळचे बिहार केडरचे असून ते 1995 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मितभाषी व कामाला महत्त्व देणारे अधिकारी म्हणून त्याची ओळख आहे. करोनाचे संकट टळेपर्यंत त्यांच्याकडे “लॉ ऍण्ड ऑर्डर’ची धुरा असेल. नव्या बदलामध्ये या ठिकाणी अन्य अधिका-यांची नियुक्ती केली जाईल, असे सांगण्यात आले.
विनय चोबे यांच्या पाठोपाठ अमितेशकुमार (एसआयडी), नवल बजाज (सहआयुक्त प्रशासन) आणि प्रवीण साळुंखे (सीआयडी) यांच्या पदोन्नतीबाबत दोन महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले होते. मात्र चोबे यांच्या एकट्याच्याच बढतीचा आदेश त्याच पदावर काढण्यात आला.
गेल्या तीन महिन्यांपासून रिक्त असलेले महाराष्ट्र सायबर पोलीस विभागाच्या विशेष महानिरीक्षकपदी यशस्वी यादव यांची नियुक्ती करण्यात आली.
याबाबत गृह विभागाच्या वतीने आदेश काढण्यात आले. गेल्या वर्षभरापासून यादव हे राज्य गुप्तवार्ता विभागात विशेष सुरक्षा विभागात कार्यरत होते. त्यापूर्वी औरंगाबाद येथे आयुक्त म्हणून कार्यरत असताना ते वादग्रस्त ठरले होते. एका प्रकरणात त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून पदभार काढून घेण्यात आला होता. चोबे यांना करोनाचा लॉकडाऊन संपल्यानंतर कोठे पोस्टिंग दिली जाते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणारे आहे.