सातारा – कराड, मलकपूर शहरांसह परिसरातील 11 ग्रामपंचायतीच्या क्षेत्र कंटेनमेंट झोनमध्ये समाविष्ट करण्यात आले असूनन या प्रतिंबंधित क्षेत्रात दोनपे7ा अधिक व्यक्ती जमा होण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच दवाखाने, हॉस्पिटल, नर्सिंग होम वगळून इतर सर्व प्रकारची दुकाने उघडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. पोलीस विभागाचा पेट्रोलपंप वगळून इतर सर्व पेट्रोल पंप बंद राहतील. यापूर्वी वेगवेगळया विभागामार्फत देण्यात आलेले सर्व पास रद्द करण्यात आले आहेत.
करोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशान्वये जिल्ह्यात क्रिमिनल कोडचे कलम 144 लागू आहे. जिल्हयात सद्यस्थितीत करोनाबाधित 18 रुग्णांपैकी 8 रुग्ण कराड तालुक्यातील असल्याने कराड शहर व नजिकची नगरपरिषद व शहरानजीकच्या विविध ग्रामपंचायतींचे क्षेत्र प्रतिबंधात्मक क्षेत्र करण्याकरीता प्रांताधिकारी तथा इन्सिडंट कमांडर यांनी प्रस्तावित केले आहे. या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कराड तालुक्यात जास्त प्रमाणात करोना विषाणूंचा संसर्ग झालेले रुग्ण आढळत असल्याने कराड तालुक्यातील संपूर्ण कराड नगरपालिका क्षेत्र, मलकापूर नगरपालिका क्षेत्र, जखीणवाडी, नांदलापूर, गोळेश्वर, कार्वे, कापील, सैदापूर, बनवडी, गोटे, वारुंजी, मुंढे, कोयना वसाहत या ग्रामपंचायतींचे क्षेत्र या कंटेनमेंट झोनमध्ये करोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी कलम 144 मधील तरतुदीनुसार पुढीलप्रमाणे 23 एप्रिल रोजीच्या रात्री बारा वाजल्यापासून ते पुढील आदेशापर्यंत मनाई आदेश जारी केले आहेत.
त्यानुसार संपूर्ण कराड नगरपालिका क्षेत्र, मलकापूर नगरपालिका क्षेत्र, जखीणवाडी, नांदलापूर, गोळेश्वर, कार्वे, कापील, सैदापूर, बनवडी, गोटे, वारुंजी, मुंढे, कोयना वसाहत या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रामध्ये कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी एका वेळेस दोनपेक्षा जास्त व्यक्तींना जमा होणेस सक्त मनाई करण्यात आली आहे. या प्रतिबंधित क्षेत्रात दवाखाने, हॉस्पिटल, नर्सिंग होम वगळून इतर सर्व प्रकारची दुकाने उघडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
फक्त अत्यावश्यक सेवेतील औषधे घरपोच पुरविण्याबाबत प्रांताधिकारी तथा इन्सिडंट कमांडर ज्याप्रमाणे यंत्रणा उभारतील, त्याप्रमाणे औषधे घरपोच पुरविण्यात येतील. या प्रतिबंधीत क्षेत्रातील पोलीस विभागाचा पेट्रोलपंप वगळून इतर सर्व पेट्रोल पंप बंद राहतील. या पेट्रोलपंपावर अत्यावश्यक सेवेसाठी नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचारी यांच्या वाहनांना इंधनपुरवठा करण्यात यावा. निकडीच्या प्रसंगी रुग्ण असल्याची खातरजमा करुनच रुग्णाची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठीच मर्यादीत स्वरुपात इंधन पुरवठा करण्यात यावा.
या आदेशामधून अत्यावश्यक सेवेमध्ये कार्यरत असणारे शासकीय, निमशासकीय, खासगी अधिकारी, कर्मचारी वगळण्यात येत आहेत. प्रतिबंधित क्षेत्रातील व्यक्तींची आरोग्य विषयक माहिती संकलित करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना चुकीची माहिती देणे हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा असून अशी चुकीची माहिती देणाऱ्याविरुध्द कठोर कारवाई करण्याची तरतूद आहे. त्यामुळे विचारलेली माहिती न लपविता पूर्णपणे तसेच अचूकरित्या नागरिकांनी द्यावी व नियुक्त केलेल्या सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांशी सौजन्याने वागावे. यापूर्वी वेगवेगळया विभागामार्फत देण्यात आलेले सर्व पास रद्द करण्यात आले आहेत.
यापूर्वी नियुक्त केले अधिकारी, कर्मचारी यांचेपैकी अत्यावश्यक असलेले अधिकारी- कर्मचारी यांनाच प्रांताधिकारी तथा इन्सीडंट कमांडंर यांनी स्वतंत्र नव्याने ओळखपत्र तसेच वाहन परवाना वितरीत करावा. वितरीत करण्यात येणाऱ्या ओळखपत्र तसेच वाहन परवान्यावर क्रमांक, दिनांक, वेळ व कार्यक्षेत्र याच्या वैधतेसह आवश्यक असणारा सर्व तपशील नमूद करावा. पोलीस विभागाने त्याच्याशी निगडीत बाबींच्या अनुषंगाने काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.