मेढा – दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बँकेच्या चेअरमनपदी विक्रम भिलारे (भिलार) यांची तर व्हाइस चेअरमनपदी चंद्रकांत दळवी (रा. म्हाते) यांची निवड झाली आहे. आज मुंबई येथे बँकेच्या मुख्य कार्यालयात अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आमदार शशिकांत शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व बँकेचे मार्गदर्शक वसंतराव मानकुमरे, माजी आमदार सदाभाऊ सपकाळ, अमितदादा कदम उपस्थित होते. संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र व्यापलेल्या दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध पार पडली. निवडणूक बिनविरोध होईल की नाही याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात होते परंतु बँकेचे प्रमुख मार्गदर्शक व जिल्हा परीषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, माजी आमदार सदाभाऊ सपकाळ, राजेंद्रशेठ राजपुरे, शिवसेनेचे संपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे, सौरभ शिंदे यांनी एकत्र प्रयत्न करून ही निवडणूक पार पाडण्यासाठी प्रयत्न केले.
आज अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी मुंबईत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवडून आलेले नवनिर्वाचित संचालक बाळासाहेब तुकाराम भालेघरे, विक्रम विजयकुमार भिलारे, गणेश नामदेव भोसले, रामचंद्र विठ्ठल चिकणे, चंद्रकांत तानाजी दळवी, विश्वनाथ ज्ञानदेव धनावडे, चंद्रकांत रावसाहेब गावडे, योगेश हरिभाऊ गोळे, अजित काशिनाथ कळंबे, संतोष रामचंद्र कळंबे, प्रकाश जगन्नाथ मस्कर, अरुण बाबुराव सुर्वे , जयश्री वसंतराव मानकुमरे, उर्मिला शिवाजी रांजणे विजय दगडू कदम, चंद्रकांत नामदेव गवळी , प्रकाश उर्फ चंद्रकांत धोंडीराम कोकरे आदी उपस्थित होते.
यावेळी चेअरमनपदासाठी विक्रम भिलारे आणि व्हाइस चेअरमन पदासाठी चंद्रकांत दळवी यांची एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष विक्रम भिलारे म्हणाले, ‘सर्व वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आणि सर्व संचालकांना बरोबर घेऊन बँकेच्या प्रगती आणि भरभराटीसाठी आपण प्रयत्न करणार आहे. या निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. भिलारे व दळवी यांचेवर सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.