लॉकडाऊन उठवल्यानंतर मनोरंजनाच्या विश्वामध्ये एकदम जोरदार हालचाली व्हायला लागल्या आहेत. शुटिंग थांबलेल्या अनेक सिनेमांचे शुटिंग सुरू झाले आहे. काही सिनेमे रिलीज होण्यासही तयार आहेत. विद्या बालननेही आपल्या “शेरनी’ या आगामी सिनेमाचे शुटिंग पुन्हा एकदा सुरू केले आहे.
या सिनेमाचे शुटिंग मध्य प्रदेशात होते आहे. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वच कलाकार, सहकारी आणि अन्य सहायक मंडळी मास्क, फेस शिल्ड लावून शुटिंग करत असल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.
इतरांप्रमाणे विद्याही सोशल डिस्टन्सिंग पाळून सेटवर पूजा करते आहे. “शेरनी’चे शुटिंग मार्चमध्ये सुरू झाले होते. पण त्याचवेळी लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे शुटिंग थांबवावे लागले होते. वन्य प्राणी आणि माणसामधील संघर्षाची कहाणी या सिनेमामध्ये दाखवण्यात येणार आहे. त्यात विद्या एका वनअधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी विद्याचा “शकुंतला देवी’ अमेझॉन प्राईम टाईमवर रिलीज झाला होता.
ओटीटी प्लॅटफॉर्म्वर रिलीज होणारा तो विद्या बालनचा पहिला सिनेमा होता. बॉक्स ऑफिसवर सिनेमा रिलीज होताना जे टेन्शन असते, तेच टेन्शन ओटीटीवर सिनेमा रिलीज होतानाही असते. हा अनुभव आपल्याला मिळाल्याचे विद्याने सांगितले.