विवेकानंद काटमोरे
हडपसर ( Winter Session 2022 ) – आज विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात हडपसरचे आमदार चेतन विठ्ठल तुपे पाटील यांनी लक्षवेधी मांडतांना मराठी बेरोजगार युवांचा प्रश्न उपस्थित केला. राज्य शासन अंगीकृत वीज वितरण महा निर्मिती कंपनीत कनिष्ठ अभियंता व सहाय्यक अभियंता या पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. परंतु काही प्रवर्गातील अर्जदारांना वेगळे कागदपत्र सादर करणे अनिवार्य करण्यात आले तर काहींना त्यात सवलत देण्यात आली. यामुळे बराच गोंधळ झाला. याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
यावेळी अधिक बोलताना आमदार चेतन तुपे म्हणाले की मराठी तरुणांवर अन्याय होईल अशी जाहिरात प्रसिद्ध केली गेली याला जबाबदार व्यक्ती, घटक कोण आहे? हा मुद्दा उचलून धरत त्यांनी राज्यातील उद्योग परराज्यात गेल्याने मराठी तरुणांचा रोजगार धोक्यात आला असतानाच तुटपुंज्या नोकऱ्या व रोजगाराच्या संधीतही मराठी तरुणांना डावलले जाण्याचे काम जाणीवपूर्वक केले जाते आहे का अशी शंका उपस्थित केली.
जाहिरातीत दिलेल्या निकषांमुळे मराठी बेरोजगार युवकांना मनस्ताप सहन करावा लागला त्याची जबाबदारी कोणाची आहे? राज्य सरकारची अंगीकृत कंपनी असल्याने याबाबत राज्य सरकारने उत्तर द्यावे अशी मागणी त्यांनी केली. ही जाहिरात प्रसिद्ध करतांना जबाबदार कोण होते याची सविस्तर चौकशी करण्यात येणार आहे का? हे जाणीवपूर्वक करण्यात आले आहे का? काही प्रवर्गातून परप्रांतीयही अर्ज करण्यास पात्र ठरत असल्याने स्पर्धा वाढून मराठी युवांचा रोजगार धोक्यात आणण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले आहे का? हे मुद्देही आमदार तुपे यांनी मांडले.
तसेच ही राज्य शासनाची अंगीकृत कंपनी असल्याने भविष्यात अशा घटना पुन्हा होऊ नये यासाठी जाहिराती प्रसिद्ध करतांना शासकीय विभागाकडून त्या तपासून घेण्यात येण्याबाबत यंत्रणा निर्माण करता येणे शक्य आहे का अशी विचारणा आमदार तुपे यांनी यावेळी केली.