हडपसर – महंमदवाडी हेवन पार्क ते सासवड रस्ता या जुन्या पालखी मार्गात काही स्थानिकांची जागा जात आहे. तिच्या संपादनाबाबत असलेल्या काही अडचणी जाणून घेण्यासाठी आमदार चेतन तुपे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. नागरिकांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला, हा रस्ता झाल्यास महंमदवाडी व हांडेवाडी रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होईल, अशी अपेक्षा आमदार चेतन तुपे यांनी व्यक्त केली.
हडपसर येथून सासवडकडे जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज जुन्या पालखी मार्गाची पाहणी आमदार चेतन तुपे यांनी केली. विशेषतः या पालखी मार्गावर असणाऱ्या हांडेवाडीरोड ते हेवन पार्क येथील रस्त्याची पाहणी केली. या रस्ता प्रकल्प जागा बाधीत तरवडे, जाधव, जरांडे, डांगमाळी या कुटुंबियांशी तुपे यांनी चर्चा केली. संबंधित जमीन मालकांनी टीडीआरच्या मोबदल्यात आगाऊ ताबा देण्याचे मान्य केले असल्याचे सांगितले.
सर्वांशी चर्चा केल्यानंतर आमादार तुपे यांनी लवकरच हे काम सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, कार्यकारी अभियंता रणनवरे, माजी नगरसेवक फारुख इनामदार, शांताराम जाधव, सोपान लोंढे, नंदू जाधव, संदीप जरांडे, अतुल डांगमाळी यांच्यासह आदी उपस्थित होते.