विकासकामांच्या बळावर आमदार लांडगे निश्‍चित विजयी होतील – रवी लांडगे

पिंपरी – राज्यातील शिवसेना, भाजप युती सरकारच्या माध्यमातून अनेक प्रलंबित प्रश्‍न मार्गी लागले आहेत. आमदार महेश लांडगे यांनी भोसरी मतदारसंघात विकासाची कामे मोठ्या प्रमाणात केली आहेत. या बळावर भोसरी मतदारसंघात यावेळी युतीचा विजय निश्‍चित असल्याचे प्रतिपादन भाजप युवा मोर्चाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष नगसेवक रवी लांडगे यांनी येथे केले.

भोसरी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, रासप, रयत क्रांती शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम संघटना महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ भोसरीतील प्रभाग क्र. 6 मधील गुळवे वस्ती, धावडे वस्ती, भगत वस्ती या भागात पदयात्रा काढण्यात आली. यावेळी रवी लांडगे बोलत होते. या पदयात्रेत महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे तसेच गोपीकृष्ण धावडे, स्वप्निल लांडगे, आकाश कंद आदी सहभागी झाले होते. यानिमित्त आमदार लांडगे यांनी मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या, ठिकठिकाणी महिलांनी त्यांना औक्षण करून शुभेच्छा दिल्या.

रवी लांडगे म्हणाले की, सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत व त्या पाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही जनतेने भाजपच्या हाती सत्ता दिली. महाराष्ट्रात युती शासनाच्या माध्यमातून पिंपरी, चिंचवड, भोसरीशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावण्यात आले. आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नातून पंतप्रधान आवास योजना, स्मार्ट सिटी, पिंपरी चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्‍तालय, आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र, नमामी इंद्रायणी, वेस्ट टू एनर्जी, संतपीठ, क्रीडा संकुले अशी अनेक विकास कामे केली गेली आहेत.

अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा प्रश्‍नही मार्गी लावला आहे. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या होत्या. त्यांना साडे बारा टक्के जमिनींचा परतावा देण्याचा विषयही मार्गी लागला आहे. चिखली, चऱ्होली, वडमुखवाडी, दिघी, मोशी परिसरात सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी नियोजित भामा आसखेड प्रकल्प राबविण्याची प्रक्रिया सुरु आहे. आगामी दीड वर्षात हा प्रकल्प कार्यान्वित होईल. त्यामुळे समाविष्ट गावातील पाण्याचा प्रश्‍न सुटेल. रेडझोनचा प्रश्‍नही नक्कीच मार्गी लागेल, असे रवी लांडगे म्हणाले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.