अहमदनगर – ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम आज शिर्डीमध्ये सुरू आहे. या कार्यक्रमासाठी प्रत्येक गावातील लोकांना आणण्यासाठी एसटी बस आरक्षित करण्यात आली आहे. या कारणामुळे ग्रामीण भागातील नेहमीच्या मार्गावरील फेऱ्या आज रद्द करण्यात आल्या आहेत. याचा सर्वाधिक फटका बसने शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थांना बसला आहे. हीच गोष्ट आज राहुरी तालुक्यात माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्राजक्त तनपुरे यांनी निदर्शनास आणून दिली आहे. इतकेच काय तर या शाळेकरी मुलांची त्यांनी मदतीही केली.
ग्रामीण भागातील नेहमीच्या मार्गावरील STच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्याने पायी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या गाडीतून शाळेत सोडलं आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. “शासन आपल्या दारी’ या शासनाच्या अतिरंजित उपक्रमामुळे संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील लोकांचे, विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. आज सकाळी हे विद्यार्थी शाळा, कॉलेजमध्ये जाण्यासाठी पायपीट करताना दिसले. कारण सर्व एस टी बसेस मुख्यमंत्री महोदयांच्या सेवेसाठी तैनात आहेत. यांच्याकडून कार्यक्रमासाठी गर्दी जमेना म्हणून खूप दुरून लोकं आणावी लागत आहेत, असे ऐकले. असो, त्यांना कार्यक्रमासाठी आणि भवितव्यासाठी शुभेच्छा!” असे ट्वीट तणपुरे यांनी केले आहे.
नेहमी प्रमाणे शाळेत जाण्याच्या तयारीने विद्यार्थी बस थांबावर उभे होते. मात्र तेथे गेल्यानंतर बस येणार नसल्याचे समजले. यासंदर्भातील नोटीस एसटी स्टँडवर लावण्यात आली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी गोंधळात पडलेले आणि अन्य वाहनांची प्रतीक्षा करणारे विद्यार्थी दिसत होते. ही बाब लक्षात घेता तनपुरे यांनी विद्यार्थांची मदत केली.
‘शासन आपल्या दारी’ या शासनाच्या अतिरंजित उपक्रमामुळे संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील लोकांचे, विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. आज सकाळी हे विद्यार्थी शाळा, कॉलेजमध्ये जाण्यासाठी पायपीट करताना दिसले. कारण सर्व एस टी बसेस मुख्यमंत्री महोदयांच्या सेवेसाठी तैनात आहेत. यांच्याकडून… pic.twitter.com/IaLd1VpVsi
— Prajakt Prasadrao Tanpure (@prajaktdada) August 17, 2023
दरम्यान, नगर जिल्ह्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रम आज शिर्डीत सुरू असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत.