नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यातील ताण आता चव्हाट्यावर येताना दिसत आहे. राज्यपाल सरकारच्या कामात हस्तक्षेप करत असल्याची टीका ममता बॅनर्जी सरकारकडून वारंवारपणे केली जात आहे. त्यातच राज्यपालांकडून देखील त्याला प्रत्युत्तर दिले जात आहे. त्यातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. खुद्द राज्यपाल जगदीप धनखार यांनी देखील हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.
पूर्व मिदनापूरमध्ये आयोजित पोलिसांच्या एका कार्यक्रमातील हा व्हिडीओ आहे. मागच्या आठवड्यात ममता बॅनर्जी यांनी राज्यपाल जगदीप धनखार यांच्यावर वरीष्ठ अधिकाऱ्यांना धमकावल्याचा गंभीर आरोप केला होता. यामध्ये मुख्य सचिव आणि डीजीपींचा देखील समावेश आहे. भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी हे पूर्व मिदनापूरचे असून नंदीग्राममध्ये त्यांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव केला आहे. या पार्श्वभूमीवर हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे.
WB Governor:
Hon’ble CM to SP in full media glare.
“Did Governor call you? Did he instruct you? What to or what not to do? I know you will not admit that. But feel free to do your assigned work. You are working for state government, mind it. Do not get afraid of such things..” pic.twitter.com/2x2gP71GbP
— Governor West Bengal Jagdeep Dhankhar (@jdhankhar1) February 3, 2022
राज्यपालांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ममता बॅनर्जी पूर्व मिदनापूरच्या पोलीस अधीक्षकांना थेट राज्यपालांविषयी प्रश्न विचारताना दिसत आहेत. “राज्यपाल तुम्हाला थेट फोन करतात का? काय करा किंवा काय करू नका असे आदेश ते तुम्हाला देतात का? मला माहिती आहे की तुम्ही हे मान्य करणार नाही. पण त्यात तुम्ही नका पडू. तुम्हाला सोपवलेलं काम पार पाडण्याचा प्रयत्न करा. तुम्ही राज्य सरकारसाठी काम करत आहात हे लक्षात ठेवा. अशा गोष्टींना घाबरू नका”, असे ममता बॅनर्जी या अधिकाऱ्यांना बजावत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
“मी तुम्हाला इथे पाठवलंय जेणेकरून तुम्ही चांगलं काम कराल. पण माझ्याकडे तक्रारी येत आहे. जर तुम्हाला वाटलं की कुठल्यातरी राजकीय दबावामुळे तुम्हाला मोकळेपणाने काम करता येत नाही, तर तुम्ही थेट मला सांगू शकता. इतर कुणाचंही काही ऐकू नका”, असे देखील ममता बॅनर्जींनी या अधिकाऱ्याला सांगितले आहे.