मुंबई – महाविकास आघाडी सरकारने विदर्भ मराठवाड्यावर कधीही अन्याय केला नाही व करणार नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत स्पष्ट केले.
लोकसंख्या प्रमाणात विभागाला निधी मिळाला पाहिजे ही भुमिका असून निधी वाटपात उर्वरित महाराष्ट्रापेक्षा विदर्भ मराठवाड्याला झुकते माप दिले आहे असेही त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री पवार अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देत होते.मॉलमध्ये वाईन विक्रीबाबत विरोधकांच्या टीकेबाबत ते म्हणाले, अद्याप अशी विक्री सुरू झाली नाही. हरकती सुचना पाठविण्यासाठी नव्वद दिवसांची मुदत आहे.
जर जनतेला नको असेल तर तो निर्णय लादला जाणार नाही.यासंदर्भात चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदीचे उदाहरण देताना ते म्हणाले, तिथे यासंदर्भातील गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले होते.