संवेदनशील पोलिसांमुळे वाचले जेष्ठाचे प्राण

लष्कर व समर्थ पोलिसांच्या समन्वयाने वृद्धास दाखल केले रुग्णालयात

पुणे: पोलीस ठाणे आणि त्यांची हद्द हा अनेकदा वादाच विषय ठरतो. एखादी घटना घडली तर ती कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली हे प्रथम पाहिले जाते. त्यानंतरच गुन्हा दाखल केला जातो. मात्र, क्‍चीतचहद्दीचा वाद न घातला चांगल्या कामासाठी दोन पोलीस ठाण्यातील कर्मचारी एकत्र आलेले दिसतात. असेच एक उदाहरण लष्कर पोलीस ठाण्याच्याहद्दीत पहावयास मिळाले. घरात बेशुद्ध पडलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला वाचवण्यासाठी दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. यातून लष्कर आणी समर्थ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी एक आदर्श उदाहरण घालून दिले.

लष्कर परिसरातील एका घरामधील आजोबांनी दोन-तीन दिवसांपासून दार उघडले नव्हते. आजोबांचे काही बरेवाईट झाले असल्याचे शंकेने नागरिकांनी याची खबर पोलिसांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतला तेव्हा दरवाजा आतून बंद आढळला. यामुळे पोलिसांना लोखंडी ग्रीलचे गेट आणी मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश करावा लागला. घरामध्ये पहाताच आजोबा बेडवरून खाली बेशुद्धावस्थेत पडलेले आढळले. पोलिसांनी त्यांना तत्काळ रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून ते उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत.

पैरुशस्प दस्तूर ( वय 70, रा. साचापीर, लष्कर) असे आजोबांचे नाव आहे. ते एका खासगी कंपनीतून निवृत्त झाले असून अविवाहित असल्याने एकटेच राहातात. वयोमानानुसार ते अधूनमधून आजारी असल्याने कधी कधी घरातून बाहेर पडत नाही. शेजारील नागरिकांनाही याची माहिती आहे. मात्र, मागील दोन ते तीन दिवसांपासून ते घरातून बाहेरच पडताना दिसले नाही. तसेच त्यांच्या घराचा दरवाजाही बंद होता. यामुळे काही सजग नागरिकांनी तत्काळ लष्कर पोलीस ठाण्यातील चारबावडी चौकीला याची माहिती दिली. चौकीतील मार्शल सलमान शेख व सुरेश पवार यांनी घराकडे धाव घेतली. पोलीस आल्याचे पाहून तेथे शेजाऱ्यांनी गर्दी केली होती. दरम्यान गर्दीपाहून तेथून जाणारे समर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई नीलेश साबळे, सुमित खुट्टे तेथे दाखल झाले. त्यांनी घडलेल्या घटनेची माहिती घेत तेथील लष्कर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने बंद लॉक असलेला दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा दस्तूर हे बेशुद्धावस्थेत बेडच्या खाली पडलेले दिसले. त्यांना तातडीने रुग्णवाहिका बोलावून त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे मदत कार्य लष्कर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस फौजदार दाहोत्रे, पोलीस शिपाई सलमान शेख, सुरेश पवार, समर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई नीलेश साबळे, सुमित खट्टे यांनी केले.

क्रिस्प टास्कमधील आरोपींना चेक करण्यासाठी सहकाऱ्यासह चाललो होते. तेव्हा लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका घरासमोर मोठी गर्दी दिसली. ही हद्द आमची नसली तरी गर्दी पाहून घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली. तेथे लष्कर पोलीस ठाण्यातील कर्मचारी दाखल झाले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांना सहकार्य करत ज्येष्ठ नागरिकाला रुग्णालयात पाठवले.
: नीलेश साबळे, (पोलीस शिपाई, समर्थ पोलीस स्टेशन)

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)