मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनचे वडील आणि ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक रवी टंडन यांचे वयाच्या 86व्या वर्षी निधन झाले आहे. मुंबईतील राहत्या घरी आज पहाटे 3.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याबाबत रवीनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत वृत्ताला दुजोरा दिला.
रवीनाने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत ही दुःखद बातमी दिली. रवीनाने तिच्या वडिलांसोबत फोटो शेअर करत तुम्ही नेहमी माझ्याबरोबर चालत रहाल, मी नेहमीच तुमची असेन, मी कधीही तुम्हाला जाऊ देणार नाही. लव्ह यू बाबा, असे कॅप्शन तिने दिले.
रवी टंडन हे मागील काही काळापासून त्यांना फुफ्फुसाचा त्रास होता. फुफ्फुसातील फायब्रोसिस नावाच्या आजाराने ते त्रस्त होते. यामुळे त्यांना श्वास घेण्यास खूप त्रास होत होता.
दरम्यान, रवी टंडन यांनी 70 आणि 80 च्या दशकात अनेक हिट चित्रपट दिग्दर्शित केले होते. “खेल खेल में’, “मजबूर’, “अनहोनी’, खुद्दार’, “जिंदगी’, “नजराना’ यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करून त्यांनी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवला. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी दिग्दर्शन कारकीर्दीची सुरूवात केली आणि काही चित्रपटांचे दिग्दर्शन तसेच निर्मिती केली.