अनुषा दांडेकरची अभिनेता भूषण प्रधानसाठी खास पोस्ट; म्हणाली “माझं तुझ्यावर खूप प्रेम”

मुंबई– अभिनेत्री अनुषा दांडेकर आणि अभिनेता भूषण प्रधान यांच्या अफेअरच्या अनेकदा चर्चा रंगल्या आहेत. मात्र अद्यापही याबाबत दोघांनी कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. अनेकदा सोशल मीडियावर दोघांचे एकत्र फोटो पाहायला मिळतात. यातच आता अनुषाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर भूषणसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.
अनुषाने भूषण आणि तिचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “मी जास्त चित्रपट केले नाहीत. मी जास्त सूत्रसंचालन करत आले आहे. कोणत्याही कलाकाराचं सहकलाकार असणं ही एक वेगळी भावना असते, कारण तुम्हाला एक विशिष्ट पात्र साकाराचे असते. त्यादरम्यान तुम्हाला नुकत्याच भेटलेल्या लोकांसोबत खूप वेळ घालवायचा असतो. हे अशा एका नात्याचे चक्र आहे, ज्यासाठी तुम्ही खरोखर तयार नसता.”
“आज मला एका खास सहकलाकाराचे आभार मानायचे आहेत, ज्याने प्रत्येक पावलावर माझी मदत केली आणि मला धीर दिला. प्रोफेशनल असूनही त्याने मला उत्तम काम करण्यासाठी नेहमीच वेळ दिला आहे. सेटवर इतरांप्रमाणे आत्मविश्वासू नसणं हे खूप भीतीदायक असतं. पण, जेव्हा तुमच्याकडे अशी व्यक्ती असते जी तुम्हाला नेहमी प्रोत्साहन देत असते, तेव्हा तुम्ही कल्पनाही करू शकत नाही की तो सगळा प्रवास तुमच्यासाठी किती सोप्पा होऊन जातो.”
View this post on Instagram
पुढे अनुषा म्हणते, “जेव्हा ते स्वत: उत्तम कलाकार असतात, पण ते तुम्हाला कधीच त्यांच्यापेक्षा कमी लेखत नाहीत. खरंच ही गोष्ट खूप मोठी असते आणि यासाठी धन्यवाद भूषण. माझा उत्तम सहकलाकार बनल्याबद्दल तुझे खूप आभार. भूषण तू मला खूप काही शिकवलंस. मी सदैव ऋणी राहीन. शूटिंगदरम्यान मला शब्द उच्चारण्यात अडचण येत होती, तेव्हा मी माझे डायलॉग्स पुन्हा पुन्हा बोलत होते, त्यावेळी तू कधीच माझ्यावर हसला नाहीस. त्याऐवजी मी ते बरोबर करेन याची खात्री करण्यासाठी तू मला जास्त वेळ दिला’.
“या चित्रपटानंतरही जेव्हा तू दुसर्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होतास, तेव्हा तू मला माझ्या प्रत्येक डायलॉगच्या व्हॉईस नोट्स पाठवल्यास, कारण मी माझं डबिंग उत्तमरित्या करू शकेन. तुला खूप धन्यवाद, मला तुझ्याबरोबर काम करायला खूप आवडलं, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तु खूप भारी आहेस.” या पोस्टनंतर दोघांच्याही डेटींगच्या चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, अनुषा दांडेकर तिच्या ग्लॅमरस लुक्स आणि बोल्ड फॅशनसाठी ओळखली जाते. नुकतीच ती महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘जुनं फर्निचर’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. हा चित्रपट १० एप्रिल रोजी प्रदर्शित झाला होता.





