मुंबई – ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांनी बुधवारी वयाच्या 93व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील अंधेरी येथील घरी त्यांच पार्थिव आज अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, देव यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी मनोरंजन क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती.
रमेश देव यांची काही दिवसांपासून प्रकृती खालावली होती. यानंतर कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, बुधवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली होती.
विलेपार्ले पूर्वी परिसरातील पारसी वाडा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. याप्रसंगी अभिनेता अजिंक्य देव यांनी वडिलांना मुखअग्नी दिला. याप्रसंगी बॉलीवूडसह चित्रपटसृष्टीतील मान्यवर उपस्थित होते. यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देव कुटुंबियांची भेट घेवून त्यांचे सात्वंन केले.
दरम्यान, रमेश देव यांच्या जाण्याने सिनेसृष्टी शोकसागरात बुडाली आहे. सिनेसृष्टीतील सर्व दिग्गज कलाकारांकडून रमेश देव यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली.