पर्यायी मार्गामुळे तळेगाव ढमढेरे आठवडे बाजारात वाहतूक कोंडी
तळेगाव ढमढेरे – वेळ नदीला आलेल्या पुरामुळे येथील आठवडे बाजारात पाणी शिरल्याने वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी पर्यायी मार्गाचा अवलंब करून स्थानिक नागरिकांनी वाहतूक कोंडीतून सुटका करून घेतली.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) हे शिरूर तालुक्यातील मोठं गाव म्हणून ओळखले जाते. सध्या होत असलेल्या अवेळी पावसामुळे सर्वत्र नद्यांना पाणी सोडण्यात आले आहे. त्याप्रमाणे गेल्या काही दिवसांपासून वेळ नदीला पाणी सोडण्यात आल्याने नदीपात्र दुथडी भरून वाहत असून पुलावर पाणी आले आहे. तळेगाव ढमढेरेत दर सोमवारी आठवडा बाजाराबरोबर शेळी, कोंबड्यांचा बाजार नदीपात्राच्या नजीक भरत असतो; परंतु या नदीपात्रात पाणी आल्याने खरेदी विक्रीसाठी आलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. या बाजारासाठी परिसरातील शेतकरी शेतातील सकाळच्या वेळी ठोक भाजीपाला विक्री करण्यासाठी येत असतात. तसेच परिसरातील शेळ्या, बकरी आणि कोंबड्या विक्रीसाठी सकाळीच बाजारात हजेरी लावतात.
दिवसभर या बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असते. तळेगाव ढमढेरे येथील झपाट्याने वाढत चाललेल्या नागरीकरणामुळे या परिसरातील 10 ते 15 गावांमधून नागरिक भाजीपाला व आठवडा किराणा बाजार खरेदीसाठी दर सोमवारी येतात. यामुळे बाजारात नेहमीच गर्दी असते. त्यामध्ये गेल्या आठ दिवसांपासून चाललेल्या पावसाने नदीला पाणी वाढले असल्यामुळे वेळ नदीचा पूल पाण्याखाली गेला आहे.
आज (दि. 4) बाजाराच्या दिवशी वाहनांना पुलावरून जाण्यासाठी अडथळा निर्माण झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे अनेकांची मोठी गैरसोय झाली. या बाजारासाठी जिल्ह्यातील शिरूर तालुक्याबरोबर दौंड, हवेली परिसरातील व्यापारी खरेदी-विक्री करण्यासाठी येतात. त्यांच्याकडील वाहने लावण्यासाठी वाहनतळ उपलब्ध सोय नसल्याने वाहतूक कोंडीवाढीचे प्रमुख कारण ठरले होते. यावेळी वाहतूक कोंडी झाल्याने परिसरातील नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून तात्पुरती सुटका मिळवली; परंतु बाहेर गावातून आलेल्या वाहनचालक व शेतकऱ्यांना वाहतूक कोंडीचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागला.