वाहन क्षेत्र रिव्हर्स गिअरमध्ये; जून महिन्यातही वाहन विक्री घसरली

नवी दिल्ली – गेल्या अनेक महिन्यांपासून विविध कारणांमुळे देशातील वाहन विक्री कमी होत आहे. जून महिन्यातही मारुती, ह्युंदाई, टाटा मोटर्स, टोयोटा या आघाडीच्या कंपन्यांच्या विक्रीत घट झाली आहे.

मारुती सुझुकी कंपनीच्या विक्रीत 15.3 टक्‍क्‍यांची घट होऊन या कंपनीची 1,14,861 एवढी वाहने विकली गेली. गेल्या वर्षी जून महिन्यात 1,35,662 एवढी वाहने विकली होती. ह्युंदाई मोटर इंडियाच्या विक्रीत जून महिन्यात 7.3 टक्‍क्‍यांची घट होऊन या कंपनीची 42.007 एवढी वाहने विकली. गेल्या वर्षी 45,314 एवढी वाहने विकली होती.
टाटा मोटर्सच्या विक्रीत 27 टक्‍क्‍यांची घट होऊन या कंपनीची जून महिन्यात केवळ 13,351 वाहने विकली गेली. गेल्यावर्षी कंपनीला 18,213 विकण्यात यश मिळाले होते. टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनीच्या वाहन विक्रीत 19 टक्‍क्‍यांची घट होऊन या कंपनीची 10,603 एवढी वाहने विकली गेली.

मे महिन्यात तर एकूण वाहन विक्रीत 20 टक्‍क्‍यांची घट झाली होती हा अठरा वर्षाचा नीचांक होता. दुचाकी वाहन क्षेत्रातील बजाज ऑटोच्या जूनमधील विक्रीत एक टक्का घट झाली. या महिन्यात या कंपनीने एक 1,99,340 वाहने विकली. गेल्या वर्षी कंपनीने 2,00,949 एवढी वाहने विकली होती. टीव्हीएस मोटार कंपनीच्या विक्रीत 8 टक्‍क्‍यांची घट झाली आहे. तर जून महिन्यात सुझुकी मोटरसायकल कंपनीच्या विक्रीत 22 टक्‍क्‍यांची वाढ झाली. या महिन्यात या कंपनीने 57,023 वाहने विकली. आगामी काळाबाबत फारशी आशादायक परिस्थिती दिसत नाही असे या क्षेत्रातील जाणकारांना वाटते.

महिंद्रा कंपनीच्या विक्रीत वाढ

जून महिन्यात महिंद्रा कंपनीच्या विक्री 4 टक्‍क्‍यांची वाढ होऊन या कंपनीची 18,8,26 वाहने विकली गेली. गेल्यावर्षी या कंपनीचे 18,137 वाहने विकली गेली होती. महिंद्रा समूहातील वाहन विभाग अध्यक्ष राजन वधेरा यांनी सांगितले की, वाहन बाजारात विशेषत: प्रवासी वाहन बाजारात मंदी आहे. मात्र तरीही आम्ही नव्याने सादर केलेल्या काही कार्यक्षम वाहनांमुळे आमच्या विक्रीत वाढ नोंदली गेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.