पिंपरी – घरात पत्ते खेळू न दिल्याने शेजारी राहणाऱ्या इसमाने घरातील बाप-लेकांना लोखंडी फावड्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले. मार खाणाऱ्या बाप-लेकांना वाचवायला येणाऱ्याला मारुन जखमी केले. ही घटना मोशी येथील सहयोग कॉलनी येथे दि. 30 जून रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली.
आकाश गोपाळ नवघरे (वय-22), गोपाळ नवघरे, लक्ष्मण खंदारे असे मारहाणीत जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी आकाश नवघरे यांने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन कृष्णा गायकवाड (वय-35) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी गायकवाड फिर्यादी आकाश यांच्या घराशेजारीच राहतो. आरोपी आकाश यांच्या घरात पत्ते खेळत होता.
यावेळी फिर्यादी यांनी घरात पत्ते खेळू दिले नाहीत, म्हणून आरोपी गायकवाड याने आकाशला फावड्याने बेदम मारहाण करुन दोन्ही हाताला दुखापत केली. गायकवाड हा आकाश याला मारहाण करीत असताना लक्ष्मण खंदारे हे सोडवण्यासाठी आले असता त्यांनाही फावड्याने मारुन त्यांच्या डोळ्याला व तोंडाला दुखापत केली. तसेच आकाश याचे वडील गोपाळ यांना दगडावर ढकलून देऊन दुखापत केली. आरोपी गायकवाड याला पोलिसांनी अद्याप अटक केलेली नसून अधिक तपास भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गिरी करीत आहेत.