नवी दिल्ली – जून महिन्यांमध्ये वाहनांच्या किरकोळ विक्रीमध्ये भरीव वाढ झाली असल्याची आकडेवारी वाहनांच्या वितरकांनी जारी केली आहे. वितरकांची संघटना असलेल्या फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन या संघटनेने म्हटले आहे की जून महिन्यामध्ये 1,84134 वाहनांची विक्री नोंदली गेली.
मे महिन्यामध्ये बऱ्याच राज्यात निर्बंध असल्यामुळे केवळ 85, 733 वाहनांची विक्री झाली होती. देशभरातील 1,295 वितरकाकडून मिळविलेल्या माहितीच्या आधारावर ही आकडेवारी जारी करण्यात आली आहे. जून महिन्यात दुचाकीची विक्री वाढून 9, 30, 324 इतकी झाली आहे. मे महिन्यामध्ये 4,10,757 एवढ्या दुचाकीची विक्री झाली होती. जून महिन्यामध्ये व्यावसाईक वाहनांची 35,700 इतकी विक्री झाली आहे. मे महिन्यामध्ये हे प्रमाण केवळ 17,534 इतके होते.
तीन चाकी वाहनाच्या विक्रीतही वाढ झाली असून मे महिन्याच्या 5,215 वाहनांच्या तुलनेत जून महिन्यात 14,732 तीन चाकी वाहनांची विक्री झाली आहे. जून महिन्यामध्ये ट्रॅक्टरच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. या महिन्यात 52,261 ट्रॅक्टरची विक्री झाली. मे महिन्यामध्ये केवळ 16,616 ट्रॅक्टरची विक्री झाली होती. जून महिन्यामध्ये एकूण वाहन विक्री 12,17,151 इतकी झाली आहे.
मे महिन्यामध्ये हे प्रमाण केवळ 5,35,855 इतके होते. त्या संघटनेचे अध्यक्ष विंकेंश गुलाटी यांनी सांगितले की, बऱ्याच राज्यातील निर्बंध कमी करण्यात आल्यामुळे वाहन विक्री वाढत आहे. त्याचबरोबर चांगला पाऊस पडल्यामुळे खेड्यातून मागणी वाढत आहे. आगामी काळातही या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.
एकीकडे मागणी वाढत असतानाच वाहनांच्या निर्मितीवर मात्र सेमीकंडक्टरच्या तुटवड्यामुळे परिणाम होण्याची शक्यता आहे. कंपन्या सेमीकंडक्टर मिळविण्यासाठी गेल्या एक वर्षापासून प्रयत्न करीत आहेत. याचा फक्त भारतीय वाहन उद्योगांवर नाही तर जागतिक वाहन उद्योगावर परिणाम झाला आहे.