लंडन – ब्रिटनमध्ये करोना संसर्गाचे प्रमाण अजूनही आटोक्यात येण्याचे लक्षण दिसत नाही. शुक्रवारी ब्रिटनमध्ये 35 हजार 707 नव्या रुग्णांची नोंद झाली. गेल्या 5 महिन्यातील ही सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद झाली आहे.
गुरुवारी ब्रिटनमध्ये 32 हजार 551 रुग्णांची नोंद झाली होती. गेल्या आठवड्याभरात दर दशलक्ष लोकसंख्येमागे 410 रुग्णांची नोंद होत आहे. ही परिस्थिती असताना ब्रिटनमध्ये 19 जुलैपासून सर्व निर्बंध हटवण्यात येतील, असे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटलेले आहे.
19 जुलै हा दिवस ब्रिटनसाठी करोनापासून स्वातंत्र्याचा दिवस असेल, असे जॉन्सन यांनी म्हटले आहे. सामाजिक अंतर, वर्क फ्रॉम होमबाबतचे निर्बंध आणि मास्कबाबतची सक्तीही या दिवसापासून हटवण्यात येणार आहे. रेस्टॉरंट आणि नाईट क्लब देखील सुरू होणार आहेत. तसेच या ठिकाणी ग्राहकांच्या संख्येवरही कोणतेही निर्बंध असणार नाही.
मात्र जॉन्सन यांच्या या योजनेमध्ये परस्पर विसंगती असून त्यामुळे गोंधळाचे वातावरण वाढेल, असे विरोधी नेते केर स्टॅमर यांनी म्हटले आहे. आरोग्य क्षेत्रातील तज्ञांनीही निर्बंध शिथिल करण्याला विरोध दर्शवला आहे.
ऍकेडमी ऑफ रॉयल कॉलेजच्या प्रो. हेलन स्टोक्स लॅमपार्ट यांनी 19 जुलैपासून सर्वकाही सुरळीत सुरू होईल, हा गैरसमज असल्याचे म्हटले आहे. ही साथ अद्याप पूर्ण ओसरलेली नाही. आपल्याला पूर्ण जबाबदारीनेच वागावे लागेल, असे त्या म्हणाल्या.
निर्बंध हटविणे हा एक धोकादायक प्रयोग आहे. पौगंडावस्थेतील किशोरांसह प्रत्येकाला लसी देण्यात येईपर्यंत सरकारने पुन्हा नव्याने सर्वकाही सुरू करू नये असे, जवळपास 4 हजाराहून अधिक वैज्ञानिक, डॉक्टर, परिचारिका व अन्य व्यावसायिकांनी बुधवारी प्रसिद्ध केलेल्या पत्रात म्हटले आहे.