शेतकरी नेते राजू शेट्टी; शरद पवारांशी आमचे मतभेद, पण ते जातीयवादी नाहीत
कराड – आगामी ऊस गाळपाचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच जूनमध्ये एक रकमी एफआरपीसाठी आम्ही आंदोलन करणार आहोत. एक रकमी एफआरपी घेतल्याशिवाय एकही कारखाना सुरू होवू देणार नाही. आणि त्याचे तुकडे करून कारखानदारांनी कारखाने सुरू करून दाखवावेत असा इशाराच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देतानाच शरद पवारांच्या बरोबर आमचे मतभेद आहेत. पण ते जातीवादी नाहीत. महागाईकडे दुर्लक्ष व्हावे म्हणूनच भोंग्याचे राजकारण सुरू आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 16 एप्रिल पासून देवराष्ट्रे पासून राज्यात बळीराजा हुंकार यात्रा सुरू केली आहे. या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असून राजकारणापलीकडे जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आणण्याचा आमचा प्रयत्न असल्याची माहिती माजी खा. राजू शेट्टी यांनी यांनी दिली.
येथील शासकीय विश्रामगृहात शनिवारी 23 रोजी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राजेंद्र गुड्डीनवार, कराड दक्षिण स्वाभिमानीचे अध्यक्ष देवानंद पाटील, उत्तरचे अध्यक्ष प्रमोद जगदाळे उपस्थित होते.
शेट्टी म्हणाले, बळीराजा हुंकार यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधणार आहे. त्यानुसार प्रत्येक गावातील ग्रामसभेत शेतीला दिवसा 10 तास वीजपुरवठा मिळाला पाहिजे, तसेच केंद्र सरकारने शेतमालाला हमीभाव मंजूर करावा, अशा आशयाचे दोन ठराव करून घेत आहोत. वास्तविक निसर्गातील 6 घटकांपासून वीज तयार होते. मात्र, विजेचे वाटप करताना शेतकऱ्याला 8 तास आणि इतरांना 24 तास हे गणित चुकीचे आहे.
शेतकऱ्यांशी सरकार क्रुरतेने वागत आहे. याविरोधात न्यायालयात दाद मागणार असून त्यासाठी ग्रामसभेमधील ठराव आम्हाला फायदेशीर ठरतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच गत 5 वर्षात सर्प दंशासह जंगली श्वापदांचे हल्ले आणि विज स्पर्शाने किती मृत्यू झाले आहेत; याची माहिती सध्या संकलीत करीत आहे. तसेच या मृत्यूला सरकारला जबाबदार धरण्यात यावे, अशी मागणीही आपण करणार असल्याचेही त्यांनी यावेळी
सांगितले.एकरकमी एफआरपीबाबत आमची संघटना आग्रही आहेच. सुरू होणाऱ्या गळीत हंगामामध्ये एक रकमी एफ.आर.पी. घेतल्याशिवाय राज्यातील साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही. त्यासाठी टोकाचा संघर्ष करणार असल्याचे राजू शेट्टींनी सांगितले. तसेच केंद्राने केलेल्या कायद्यात राज्य सरकारला बदल करण्याचा अधिकार नसल्याचेही ते म्हणाले.