नवी दिल्ली – भारतातील वाहन उद्योग वेगाने वाढत आहे. त्यामुळे वाहन वितरण उद्योगही त्याच गतीने वाढणार असल्याचे वाहन वितरकाच्या संघटनेचे नवे अध्यक्ष मनीष राज सिंघानिया यांनी सांगितले. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन या संघटनेच्या अध्यक्षपदी सिंघानिया यांचे दोन वर्षासाठी निवड झाली आहे.
ते 2024 पर्यंत या संघटनेचे अध्यक्ष असणार आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर ते म्हणाले की, भारतातील वाहन वितरकांच्या अनेक समस्या आहेत. त्या समस्या सोडवण्यासाठी आपण आगामी काळात प्रयत्न करणार आहोत.
वाहन वितरक संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आपण सर्व वितरकाशी समन्वयाने चर्चा करणार आहोत आणि हा कायदा अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. वाहन उत्पादकाबरोबर वितरकांचे संबंध चांगले राहावे यासाठी गेल्या अनेक वर्षापासून बरेच प्रयत्न चालू आहेत. आपण हे प्रयत्न पुढे चालू ठेवणार आहोत.
भारतातील वाहन उद्योग गेल्या 20 वर्षांमध्ये कमालीचा विकसित झाला आहे. आगामी काळामध्ये भारतातील वाहन उद्योग जागतिक पातळीवरील उद्योग होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या संघटनेमध्ये देशभरातील 15,000 वितरकांचा समावेश आहे. केंद्र सरकार वाहन उद्योग आणि वाहनाच्या सुट्या भागाच्या उद्योगाला चालना देत आहे. त्यामुळे आगामी काळात वितरकांचे काम वाढणार आहे.