वाहन लिलावातून ‘आरटीओ’ मालामाल

पुणे – आरटीओ प्रशासनाने विविध प्रकारची कारवाई करुन जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव करण्यात आला. दोन दिवस ही प्रक्रिया चालली. यातून प्रशासनाला तब्बल 1 कोटी 5 लाख 86 हजार 857 इतका विक्रमी महसूल प्राप्त झाला असून उच्चांकी असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

वायुवेग पथकामार्फत मोटार वाहन कायदा, 1988 मधील तरतुदींचा भंग केलेल्या वाहनांवर कारवाई केली जाते. या वाहनांवर दंडात्मक कारवाई करुन यात दोषी आढळलेली काही वाहने जप्त करण्यात येतात. मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन, थकीत कर, जादा माल वाहून नेणारी वाहने, नोंदणी रद्द केलेल्या स्क्रॅप रिक्षा आदी वाहने जप्त केली जातात. या वाहनांना विशिष्ट कालावधीने लिलाव करण्यात येतो. दि.30 आणि 31 जुलै रोजी अशा 339 वाहनांचा जाहीर लिलाव करण्यात आला.

ही प्रक्रिया प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे, संजीव भोर, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी दत्तात्रय सांगोलकर, कार्यालय अधीक्षक जगदिश कांदे, वरिष्ठ लिपिक विवेक शेळके, चेतन माने यांनी पार पाडली.

Leave A Reply

Your email address will not be published.