वीसगाव खोरे (वार्ताहर) – आंबाडे (ता.भोर) येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दि.१६ ते २२ मार्च येथे जल जागृती साप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या निमित्त शाळेत पाण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे या हेतूने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, पाणी वापरासंबंधी घोषवाक्य लेखन, पाण्याचे स्रोत व परिसर स्वच्छता, व्याख्यान यांचे आयोजन केले.
शाळेतील ७१ मुलांनी यात सहभाग घेतला. या कार्यक्रमानिमित्त केंद्रप्रमुख प्रभावती कोठावळे यांनी मार्गदर्शन केले.शाळेतील शिक्षक शरद पवार यांनी पाण्याचे महत्त्व, जागतिक जल दिन, शांततेसाठी पाणी या विषयावर माहिती दिली. दि.२२ रोजी जागतिक जल दिनानिमित्त प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. शिक्षक व विद्यार्थी यांनी पाणी जपून वापरावे या संबंधी जल प्रतिज्ञा घेतली.
मुख्याध्यापक राजू कारभळ शिक्षक शरद पवार, उज्वला भारती, मोहिनी गायकवाड उपस्थित होते. केंद्रप्रमुख प्रभावती कोठावळे व विस्तार अधिकारी शिवाजी खोपडे यांनी शाळेत राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.