वॉशिंग्टन – भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिक वनिता गुप्ता यांनी अमेरिकेच्या असोसिएट ॲटर्नी जनरल पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेच्या ज्यो बायडेन प्रशासनातील शक्तीशाली महिलांमध्ये वनिता गुप्ता यांची गणना होत होती. एप्रिल २०२१ मध्ये त्यांची असोसिएट ॲटर्नी जनरल या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आता येत्या फेब्रुवारी महिन्यात आपण हे पद सोडणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.
अमेरिकेच्या न्याय प्रणालीत तिसऱ्या क्रमांकाच्या पदापर्यंत पोहोचणाऱ्या गुप्ता या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला आहेत. एवढेच नाही तर हे पद भूषविणाऱ्या त्या पहिल्या अश्वेत महिला आहेत. २०२४ मध्ये अमेरिकेत होणारी राष्ट्रपती पदाची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून वनिता गुप्ता यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जाते आहे.
यासंदर्भात बोलताना अमेरिकेचे ॲटर्नी जनरल मेरिक बी. गारलँड म्हणाले की, सवोत्तम सेवा दिल्याबद्दल आम्ही वनिता यांचे आभारी आहोत. हिंसक गुन्हे, बंदुकीद्वारे केला जाणारा हिंसाचार आणि गुन्ह्यांमुळे पोळलेल्या पीडितांना मदत करण्यासाठी विभागाकडून करण्यात आलेल्या प्रयत्नांमध्ये एक अविभाज्य घटक म्हणून दिलेल्या पाठिंब्याबाबत आम्ही त्यांचे आभारी आहोत.
दरम्यान, गुप्ता यांची या पदावर जेंव्हा नियुक्ती करण्यात आली होती त्यावेळी स्वत: बायडेन यांनी त्यांची प्रशंंसा केली होती. त्या अत्यंत दक्ष आणि सन्माननीय वकील आहेत. वर्णसमानता आणि न्यायाच्या लढाईसाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले आहे असे तेंव्हा बायडेन म्हणाले होते.
गुप्ता या मुळच्या उत्तर प्रदेशातील अलिगढ येथील राहणाऱ्या आहेत. मात्र चार दशकांपूर्वीच त्यांचे पूर्वज अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. न्यूयॉर्क येथील विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवी घेतली आहे.