नवी दिल्ली – सध्या अटकेत असलेले संजय सिंह यांच्या जागी राघव चढ्ढा यांची आम आदमी पक्षाच्या राज्यसभेच्या नेतेपदी हंगामी स्वरूपात नियुक्ती करावी, अशी शिफारस आम आदमी पक्षच्यावतीने राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांच्याकडे करण्यात आली होती. परंतु धनखड यांनी ही विनंती फेटाळली आहे.
मान्यता प्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतोद आणि नेते पदाच्या संबंधात जे नियम आहेत त्यात ही नियुक्ती बसत नाही असे धनखड यांचे म्हणणे आहे. या घडामोडीकडे राजकीय हेतूने पाहिले जात आहे. आम आदमी पक्षाची चारही बाजूने कोंडी करण्याचे धोरण भाजपने अवलंबले आहे, हा त्याचाच एक भाग असल्याचे मानले जात आहे. आता राघव चढ्ढा यांची नियुक्ती फेटाळली गेल्याने संजय सिंह हेच या पक्षाचे राज्यसभेचे नेते राहतील. मात्र त्यांची तुरूंगातून सुटका कधी होणार हे मात्र अनिश्चीत आहे.