‘रेमडेसिविर’संदर्भात तीन नामवंत डॉक्‍टरांचा मोलाचा सल्ला; म्हणाले…

नवी दिल्ली – रेमडेसिवीर औषधाची कमतरता हा सर्वात मोठा मुद्दा ठरतो आहे. त्यामुळेच देशातील 3 मोठ्या डॉक्‍टरांनी करोना रुग्णांना याबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. यात त्यांनी कोरोना उपचारावरील काही प्रभावी गोष्टीही सांगितल्यात. या 3 डॉक्‍टरांमध्ये एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया, नारायणा हेल्थचे प्रमुख डॉ. देवी शेट्टी आणि मेदांताचे प्रमुख नरेश त्रेहान यांचा समावेश आहे.

डॉ. रणदीप गुलेरिया यांनी रेमडेसिवीर हे काही जादुई औषध नसल्याचे स्पष्ट केले. केवळ काही टक्के रुग्णांनाच याची गरज असते असंही ते म्हणाले. डॉ. नरेश त्रेहान यांनीही रेमेडेसिवीर रामबाण उपाय नसल्याचे सांगितले. तसेच हे औषध केवळ गरजू रुग्णांमधील विषाणूचा प्रभाव कमी करतं असं नमूद केलं.
डॉ. देवी शेट्टी यांनी करोना रुग्णांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. ते म्हणाले, कोणत्याही व्यक्तीच्या शरिरात 94 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक ऑक्‍सिजन असेल तर काळजी करण्याचे काहीही कारण नाही. मात्र, शरिरातील ऑक्‍सिजनची पातळी त्यापेक्षा कमी झाली तर ते चिंताजनक आहे. यावेळी तुम्हाला डॉक्‍टरांच्या उपचाराची गरज आहे. अशा परिस्थितीत योग्य वेळी उपचार मिळणं अत्यावश्‍यक आहे.

जर एखाद्या व्यक्तीची चाचणी पॉझिटीव्ह आली आणि त्याला कोणतंही करोनाचं लक्षण नसेल तर अशा रुग्णांना डॉक्‍टरांनी घरी राहण्याचा सल्ला दिला आहे. घरीच राहून दर 6 तासांनी ऑक्‍सिमीटरच्या सहाय्याने आपली ऑक्‍सीजनची पातळी तपासत राहावी. जर एखाद्या व्यक्तीला अंगदुखी, सर्दी, खोकला, अपचन, उलट्या अशी लक्षणं असतील तर त्यांनी तातडीने करोना चाचणी करावी. ते सर्वात जास्त महत्त्वाचं आहे असे सांगण्यात आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.