नगर (प्रतिनिधी) – स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाने काल सायंकाळी शहरातील साईदीप हॉस्पिटलजवळ बनावट ग्राहक पाठवून काळ्या बाजाराने रेमडेसिविरची विक्री करणार्या दोघा जणांना गजाआड केले.
ज्ञानेश्वर कौतूक हारपे (वय 21, रा. सिडको, औरंगाबाद, हल्ली रा. एम.आय.डी.सी. नगर) व महेश नारायण कुर्हे (वय 26, रा. साईनगर, वाघमळा, सावेडी) अशी अटक केलेल्यांची नाव आहेत. सुहास जगताप (रा. वांबोरी, ता. राहुरी) या तिसरा संशयित आरोपी असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
अधिक माहिती अशी, की बनावट रेमडेसिविर विक्री करण्यासाठी दोघेजण साईदीप हॉस्पिटलजवळ येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने संबंधिताला बनावट ग्राहकाच्या नावाने फोनवर रेमडेसिविरची मागणी केली. त्यावेळी तो म्हणाला की, एका इंजेक्शनची किमत 37 हजार रुपये आहे. त्याने इंजेक्शन नेण्यासाठी साईदीप हॉस्पिटलजवळ बोलावले.
पोलिसांनी साईदीप हॉस्पिटलजवळ अगोदरच सापळा लावला. दहा ते पंधरा मिनिटांत संबंधित व्यक्ती तेथे आली. पोलिसांनी बनावट ग्राहकाला इंजेक्शन घेण्यासाठी पाठवून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक रेमडेसिविर, तीन मोबाइल, एक मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त केला. ते इंजेक्शन त्यांनी सुहास जगताप याच्याकडून आणल्याचे सांगितले.
पोलिसांनी त्याचा शोध घेतला मात्र, तो सापडला नाही. याबाबत अन्न व औषध प्रशासनाने विवेक पांडुरंग खेडकर यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, मिथून घुगे, पोलीस कर्मचारी विश्वास बेरड, सुरेश माळी, सागर ससाणे यांच्या पथकाने केली.