बकलोह, (हिमाचल प्रदेश) – हिमाचल प्रदेशातील बकलोह येथे आयोजित करण्यात आलेल्या “वज्र प्रहार 2022′ या भारत-अमेरिकेदरम्यानच्या 13 व्या विशेष दलांच्या संयुक्त सरावाची आज सांगता झाली. दोन्ही राष्ट्रांच्या विशेष फौजांना हवाई मोहिमा विशेष मोहिमा आणि दहशतवाद विरोधी कारवाई यासंबंधी 21 दिवसांच्या संयुक्त प्रशिक्षणाची संधी मिळाली.
सरावाच्या पहिल्या टप्प्यात,युद्ध परिस्थितीत आणि सामरिक स्तरावरील विशेष मिशनसंबंधी प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके पार पडली तर दुसऱ्या टप्प्यात, पहिल्या टप्प्यातील दोन्ही राष्ट्रांच्या तुकड्यांनी घेतलेल्या प्रशिक्षणाच्या 48 तासांच्या प्रमाणीकरणाचा समावेश होता.
पर्वतीय प्रदेशात मुद्दाम तयार करण्यात आलेल्या पारंपरिक आणि गैरपारंपरिक स्थितीमध्ये मॉक प्रात्यक्षिकांचे नियोजन आणि त्याची अमलबजावणी करण्यात आली होती.
भारत आणि अमेरिका यांच्यातील संरक्षण क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्यात सुधारणा आणि संयुक्त लष्करी प्रात्यक्षिके दोन्ही देशांसाठी महत्वाची होती. या वार्षिक सरावाचे यजमानपद भारत आणि अमेरिका आळीपाळीने भूषवत असतात. ऑक्टोबर 2021 मध्ये 12वा सराव अमेरिकेतील वॉशिंग्टनच्या लुईस मॅक कॉर्ड येथे संयुक्त तळावर झाला होता.