नवी दिल्ली – करोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत वेगवेगळे कयास लावले जात आहेत. तज्ज्ञांच्या मते, भारतात लवकरच तिसरी लाट येऊ शकते. तसेच लहान मुलांवर या लाटेचा परिणाम होणार असल्याचा अंदाज तज्ञांनी वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर लहान मुलांसाठी सप्टेंबरपर्यंत भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला मान्यता मिळणार असल्याची शक्यता असल्याचे दिल्ली एम्स रूग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले.
डॉ. गुलेरिया म्हणाले, कोव्हॅक्सिनच्या फेज दुसऱ्या आणि तिसऱ्या चाचणीनंतर सप्टेंबरपर्यंत डेटा उपलब्ध होईल. तसेच फायझर-बायोटेकला भारतात मान्यता मिळाल्यास ते मुलांच्या लसीला पर्याय ठरू शकते.
2 ते 12 वर्ष वयोगटातील मुलांवर एम्स पटना आणि एम्स दिल्लीमध्ये कोव्हॅक्सिन लसीची चाचणी चालू आहे. 12 मे रोजी डीसीजीआयने मुलांवर फेज दोन आणि फेज तीन चाचणींसाठी भारत बायोटेकला मान्यता दिली होती. करोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुले सर्वात जास्त प्रभावित होतील, असे सांगितले जात आहे.
दरम्यान एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी करोनाच्या पुढील लाटेत लहान मुले संक्रमित होतील, अशी माहिती देणारा भारतात किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणताही डेटा उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे. करोना स्थितीसंबंधी माहिती देण्यासाठी आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी करोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे लहान मुलांना अनेक गंभीर आजार होणार असल्याची माहिती चुकीची असल्याचे सांगितले होते.
देशात किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर असा कोणताही डेटा उपलब्ध नाही, ज्यामध्ये करोना लाटेत मुले गंभीर संक्रमित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे, अशी माहिती रणदीप गुलेरिया यांनी यावेळी दिली.