न्युयॉर्क :- अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत रशियाचा डॅनिल मेदवेदेवने थाटात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याने चौथ्या फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या अलेक्स मिनोरवर 2-6, 6-4, 6-1, 6-2 अशी मात केली. या लढतीत मेदवेदेवने पहिला सेट गमावला होता. मात्र, त्यानंतर त्याने खेळ उंचावला व नंतरचे तीन सेट सरळ जिंकत स्पर्धेत आगेकूच केली.
अन्य लढतीत जर्मनीच्या अलेक्झांडर ज्वेरेवनेही उपांत्यपूर्व फेरीत थाटात प्रवेश केला. त्याने इटलीच्या जेन्नीक सिन्नरचा 6-3, 3-6, 6-2, 4-6, 6-3 असा पराभव केला.
दरम्यान,अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत मंगळवारी बेलारूसच्या आर्यना सबालेन्काने महिलांच्या एकेरीत अफलातून विजय मिळवताना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
या सामन्यात सबालेन्काने रशियाच्या दारीया कस्तकीनावर 6-1, 6-3 असा सहज विजय मिळवला. या स्पर्धेत कस्तकीनाला जायंट कीलर मानले जात होते, मात्र, तीलाच सरळ दोन सेटमध्येच पराभवाचा सामना करावा लागला. सबालेन्काने तीला कोणतीही संधीच दिली नाही.
महिलांच्या एकेरीत अन्य सामन्यात ट्युनिशियाच्या ओन्स जेबुरलाही पराभवाचा धक्का सहन करावा लागला. या सामन्यात तीला चीनच्या झेंग क्विनवेनकडून 6-2, 6-4 असा पराभव पत्करावा लागला. जेबुरची यंदाच्या स्पर्धेतील वाटचाल स्वप्नवत होती मात्र, चौथ्या फेरीनंतर तीची कामगिरी खालावली.