पिंपरी – कांद्याचे दर गगनाला भिडल्यामुळे स्वयंपाक घरातून गृहिणींकडून कांद्याचा हातचे राखून वापर केला जात आहे. तर आता कुठे सुरु झालेल्या हॉटेल्सला कांदा दरवाढीचा सामना करवा लागत असल्याने हॉटेल व्यावसायिकांनी ग्राहक वर्गाला कांद्याऐवजी कोबी आणि मुळा यांना देण्यासाठी पसंती दिली आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर जवळ जवळ सहा ते सात महिन्यांपासून हॉटेल व्यवसायावर बंदीची कुऱ्हाड कोसळली होती. आता कुठे हॉटेल चालू करण्याला परवानगी मिळाली. त्यामुळे विविध खाद्यपदार्थांची मागणी वाढली आहे. परंतु विविध भाज्यांना चव आणण्यासाठी कांद्याचे भाव गगनाला भिडल्यामुळे ते ग्राहकवर्गाला देणे परवड नसल्याचे चित्र आहे.
ग्राहक वर्गातून पावभाजी, मिसळपाव, मांसाहार आदींसाठी कांद्याचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. तसेच जेवणाबरोबर ग्राहकाला कांदा दिला जातो. परंतु सध्या कांदा विकत घेणे अवघड झाल्याने ग्राहकांच्या सेवेतून कांदा हद्दपार झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता विविध हॉटेलमध्ये कांद्याची जागा कोबी आणि मुळ्याने घेतली आहे. त्यामुळे कांदा खाणाऱ्या ग्राहकवर्गातून नाराजीचे सूर निघत आहे.
सध्या बाजारात नवीन कांद्याला 40 ते 60 रुपये किलो, तर जुन्या कांद्यासाठी प्रतिकिलो 60 ते 80 रुपये भाव मोजावा लागत आहे. तर सर्वसाधारणपणे निर्यातबंदीच्या काळात कांद्याचे भाव कमी झाले होते. परंतु किरकोळ बाजारात कांद्याचे भाव कमी न झाल्याने गहिणींनी देखील कांदा खरेदी करताना हात आखडता घेतल्याचे दिसत आहे.