वेल्हे, (प्रतिनिधी) – इंद्रायणी तांदुळाचे आगर म्हणून प्रसिद्ध असलेल्या व महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या ठिकाणांपैकी एक असलेल्या राजगड तालुक्यामध्ये. खरीप पूर्व हंगामी शेती माशागत कामांना गती आली आहे. गाव खेड्यांमध्ये पारंपारिक शेती मशागतीबरोबरच आधुनिक पद्धतीने शेतीची कामे करण्यात येत असल्याचे संपूर्ण राजगड तालुक्यात पाहायला मिळत आहे. मागील आठवडाभर दिवसा उन तर सायंकाळी पडणाऱ्या पावसामुळे काही प्रमाणात या कामांना गती येताना पाहायला मिळत असतानाच राब भाजणीला मात्र उशीर होत आहे. या भागामध्ये धूळ वाफेवर मोठ्या प्रमाणात भात पेरणी केली जाते. तालुक्यामध्ये प्रामुख्याने तांदळाच्या विविध जातींचे उत्पादन घेतले जाते. परंतु राजगड तालुक्यातील इंद्रायणी तांदूळ संपूर्ण राज्यातच नाही तर भारतामध्ये प्रसिद्ध असून या तांदळाला परदेशातसुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्याचबरोबर नाचणी, वरई ही उत्पादने प्रामुख्याने तालुक्यातील दुर्गम भागात घेतली जातात. त्यांना बाजार पेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. खरीप पूर्व हंगामामध्ये पावसाची प्रतीक्षा करीत असताना या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात शेत खाचरांची वाजवनी (मशागत ) करताना पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी पारंपारिक शेतीबरोबरच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या भात शेतीची तयारी करण्यात येते. त्याच बरोबर भविष्यातील भात लावणीनंतर लागणाऱ्या रासायनिक खतांची सुद्धा तजवीज करण्याच्या दृष्टीने शेतकरी वर्ग प्रयत्नशील आहे. कारण पूर्वी इतके सेंद्रिय खत सध्या उपलब्ध होत नाही. तालुक्यात पाळीव पशूंची संख्या सुद्धा कमी झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार यावर्षी पावसाचे एक आठवडा अगोदरच आगमन होणार असून. यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे शेतकरी या अंदाजामुळे सुखावला असतानाच. पुढील वर्षी तांदूळ उत्पादनातून चांगला आर्थिक लाभ मिळणार असल्याच्या आशेवर कामाला लागला आहे. हाताजोगी कामे करण्यास संपूर्ण कुटुंबाच्या कुटुंब सरसावली असून काही ठिकाणी रोपटी पाडणे, ताली, घळणे, आवजरे दुरुस्त करणे, घरे शेकरणे अशी कामे करण्यात सरसावली आहेत. हे जरी खरी असले तरीही मनुष्यबळ उपलब्धता ही मोठी अडचण असून या चिंतेत शेतकरी असतानाच आधुनिक तंत्रज्ञानाचा शोध घेताना पाहायला मिळत आहे. तालुक्यातील अनेक शेतकरी कुटुंबासह नोकरी, व्यवसाय व अन्य कारणांबरोबरच काहींनी शेती विक्री केल्यामुळे पुणे, मुबई व अन्य शहरांमध्ये वास्तव्यास गेले आहेत. त्यामुळे शेत मजुरांची उपलब्धता कमी आहे, पाळीव पशुंपासून मिळणारे सेंद्रिय खत, नांगरणी, चिखलनी या गोष्टींचा प्रामुख्याने विचार करावाच लागतो अन्यथा शेती करणे अवघड आहे. राजगड तालुक्यातील अनेक गावांची परिस्थिती पाहता भात शेती लागवड करण्याजोगी असून सुधा दोन तीन वर्ष तशीच पडून आहे. अनेक शेतकरी यांनी दैनिक प्रभातशी बोलताना सांगितले. आमची राजगड पायथा गुंजवणे येथे भात शेती आहे. पूर्वी आम्ही भातशेती आर्धलीने कसायला द्यायचो. परंतु सध्या शेती करण्यासाठी कोणीच मिळत नाही. त्यामुळे आपल्याला स्वतःलाच ती कसावी लागते. प्रत्यक्ष भात पेरणी, लागवड, मळणी आणि प्रत्यक्ष हातात येणारा तांदूळ यामध्ये प्रचंड तफावत आहे. उत्पादन खर्च आणि प्रत्यक्ष झालेले उत्पादन यात जमीन असमानचा फरक आहे. शेतमजूर मिळत नाही, पाळीव जनावरांची संख्या कमी, आधुनिक साधनांची उपलब्धता कमी, सेंद्रिय आणि रासायनिक खते सुद्धा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक असल्याचे निदर्शनास येते परंतु आपली शेती आणि आपल्या शेतीतला तांदूळ खाण्याचा आनंदच वेगळा म्हणून हे सर्व करायचं. – ज्योती दीपक मानकर, शिक्षिका सहकार नगर, पुणे शहरांमध्ये जाऊन पाच आणि दहा हजार रुपयांच्या नोकऱ्या करण्यापेक्षा गावाकडे पारंपारिक व आधुनिक पद्धतीने केलेली शेती निश्चितच आपणाला वार्षिक आर्थिक लाभ मिळवून देते. त्यामुळे शेती व्यवसायातून आर्थिक लाभ होत नाही ही युवकांची ओरड चुकीची आहे. मागील अनेक वर्षांपासून मी वेल्हे येथे कमी क्षेत्रामध्ये पारंपारिक व आधुनिक पद्धतीने शेती व्यवसाय करीत असून. मला व माझ्या कुटुंबाला यातून आमचे घराचे वार्षिक हमकास आर्थिक उत्पन्न मिळत आहे. शासनाने संधी दिल्यास मी गाव खेड्यातील शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन करण्यास तयार आहे. शिवाजी देवगिरीकर, वेल्हे, ता. राजगड