भाजपाच्या प्रचार साहित्यात एअर स्ट्राईकचा वापर

प्रचार साहित्य जप्त ; निवडणूक आयोगाची कारवाई

मुुंबई – लोकसभा निवडणूकीतील प्रचार साहित्यात सर्जिकल स्ट्राईक, हवाई दलाच्या विमानाचे छायाचित्र तसेच भारतीय सैन्यांच्या प्रतिमांचा वापर असलेले प्रचारसाहित्य निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने मंगळवारी छापा मारून जप्त केले. कॉंग्रेसने याप्रकरणी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

मुंबईतील खार उपनगरात ‘युनायटेड फॉस्फरस लिमिटेड’ कंपनीच्या मालकीच्या इमारतीत भारतीय जनता पक्षासाठी अनधिकृत पध्दतीने इलेक्‍ट्रॉनिक कार्ड बनविण्यात येत असल्याची माहिती कॉंग्रेस कार्यकर्त्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने कार्ड निर्मिती होत असलेल्या ठिकाणी धाड टाकली. यावेळी कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, राजू वाघमारे पथकासोबत होते. इलेक्‍ट्रॉनिक कार्डमध्ये सर्जिकल स्ट्राइक, भारतीय हवाई दलाचे विमान तसेच लष्कराची प्रतिमा वापरण्यात आली आहे. कार्डमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश रेकॉर्ड करण्यात आला आहे. कार्ड उघडताच हा संदेश ऐकू येतो. निवडणूक आयोगाने हे सर्व कार्ड आज जप्त केली.
निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने केलेल्या आजच्या कारवाईमुळे भाजपच्या कृष्णकृत्यांवर प्रकाश पडला आहे. ‘मै भी चौकीदार’ म्हणणारे चोर आहेत हे पुन्हा स्पष्ट झाले आहे. निवडणूक आयोगाच्या डोळ्यात धूळफेक करून कोट्यवधी रूपयांचे साहित्य निवडणूक प्रचारासाठी वापरण्याचा भाजपचा मानस होता हे दिसून येते, अशी टीका सचिन सावंत यांनी केली.

निवडणूक अधिकारी आणि पोलीस यांच्यासमोरच भाजपची कृष्णकृत्ये उघडकीस आल्याने भाजप अध्यक्ष अमित शहा तसेच युनायटेड फॉस्फरस लिमिटेड कंपनीचे मालक यांच्यावर याप्रकरणी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही सावंत यांनी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.