अखेरच्या सत्रातील जोरदार खरेदीमुळे शेअरबाजार निर्देशांकांत वाढ

वाहन, धातू क्षेत्रांतील कंपन्या तेजीत

मुंबई -गेल्या काही आठवड्यापासून बरीच खरेदी झाल्यामुळे शेअरबाजार निर्देशांक उच्च पातळीवर आहेत. त्यातच आता लवकरच लोकसभा निवडणुका होणार असल्यामुळे व कंपन्यांचे चौथ्या तिमाहीचे ताळेबंद जाहीर होणार असल्यामुळे निर्देशांकांत बरीच अस्थिरता निर्माण झालेली आहे. आज दिवसभर शेअर निर्देशांक कमी पातळीवर होते. मात्र, अखेरच्या सत्रात बॅंकिंग, रिअल्टी आणि धातू क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरचे भाव 1.40 टकक्‍यांपर्यंत वाढल्यामुळे मुख्य निर्देशांकांत वाढ झाली.

मंगळवारी दिवसभरात मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 350 अंकांनी कमी-जास्त झाला. मात्र, बाजार बंद होताना मंगळवारी सेन्सेक्‍स 238 अंकांनी म्हणजे 0.62 टक्‍क्‍यांनी वाढून 38,939 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 67 अंकांनी म्हणजे 0.5 टक्‍क्‍यांनी वाढून 11,671 वर बंद झाला.
परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी काल 329 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. तर देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 623 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली.

जागतिक बाजारातून आज सकारात्मक संदेश आले. जपान, चीन, जर्मनी, फ्रान्स आणि लंडन येथील शेअरबाजाराचे निर्देशांक वाढले. मात्र भारताच्या दृष्टिकोनातून चिंतेची बाब म्हणजे क्रुडच्या फ्युचरचे दर वाढून आता 72 डॉलर प्रति पिंपावर गेले आहेत. त्याचा आगामी काळात परिणाम होण्याची शक्‍यता आहे.

“लवकरच होणाऱ्या निवडणुका आणि कंपन्यांच्या ताळेबंदामुळे गुंतवणूकदार सावध आहेत. मात्र जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश आल्यामुळे काही गुंतवणूकदारांनी अखेरच्या सत्रात बरीच खरेदी केल्यामुळे निर्देशांक उच्च पातळीवर असूनही त्यात वाढ झाली.
-सुनील शर्मा, मुख्य गुंतवणूक अधिकारी, सॅंक्‍टम मालमत्ता व्यवस्थापन संस्था

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.