जीवनगाणे: पैशाचं मोल

अरुण गोखले

जीवनात जेव्हा कष्ट करून, घाम गाळून पैसे कमवावे लागतात. तेव्हा त्या पैशाच नेमकं खरं मोल आपल्याला समजतं. एका गावात एक गृहस्थ राहात होते. त्यांना एकुलता एक मुलगा होता. एकुलता एक म्हणून त्याच्या आईवडिलांनी त्याला मोठ्या लाडात वाढविलेले. त्याची हौस मौज पुरवलेली. पण त्याचा परिणाम असा झाला की, तो आळशी आणि ऐतखाऊ बनला. स्वत: चार पैसे मिळवण्यासाठी तो काही प्रयत्न करेना. तेव्हा एक दिवस त्या मुलाच्या वडिलांनी त्याला नेहमीप्रमाणे पैसे देण्यास नकार दिला. इतकेच नाहीतर त्यांनी त्याला सांगितले की, तू एखादा रुपया तरी कमवून आणलास तरंच तुला घरात जेवायला मिळेल.

मुलगा मोठ्या ऐटीत घराबाहेर पडला, त्याने मित्राकडून एक रुपया उधार मागून आणला. त्याने तो वडिलांच्या पुढे केला. ते म्हणाले, “”मला नको… दे बाहेर टाकून..”
आणि… काय! त्याने तो रुपया बाहेर टाकून दिला.
पुढे दोन-चारदा असेच रोज घडत गेले. मुलगा कोणाकडून तरी उधार उसनवार रुपया माग़ून आणायचा. वडिलांना द्यायला जायचा. प्रत्येकवेळी वडील त्याला त्याने पैसे पुढे केली की, “”दे बाहेर टाकून…” असे म्हणायचे आणि तो मुलगासुद्धा ते पैसे लगेच बाहेर टाकून द्यायचा.
तो नेहमीच पैसे मागत असल्याने एके दिवशी मात्र, त्याला कोणीच पैसे दिले नाहीत. तो मोठ्या काळजीत पडला. पैसे घरी दिले नाही तर जेवण मिळणार नाही, काय करायचं? त्याला प्रश्‍न पडला. शेवटी तो बाजारात गेला. त्याने हमाली केली. ओझी वाहिली, घाम गाळला आणि मिळालेली मजुरी घेऊन तो घरी आला. त्याने नेहमीप्रमाणे रुपया वडिलांपुढे केला. ते म्हणाले, “”मला नको… बाहेर टाकून दे…”
त्याबरोबर तो मुलगा रागाने म्हणाला, “” नाही बाबा ! मी हा रुपया बाहेर टाकणार नाही, कारण तो माझ्या कष्टाचा, घामाचा, मेहनतीचा आहे. तो मी किती कष्ट करून कमविला आहे, ते माझे मलाच माहीत आहे, तुम्हाला काय होतेय रुपया बाहेर टाकून दे म्हणायला. मी हे पैसे टाकून देणार नाही.”
मुलाचे उत्तर वडिलांनी ऐकले आणि त्यांच्या मनाला समाधान झाले. आज जेव्हा स्व-कष्टाचा पैसा टाकून द्यायला सांगितले, तेव्हा त्या मुलाला कष्टाच्या कमाईची खरी किंमत समजली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.