लंडन, ग्लासगो – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून आणि ब्रिटनसह भारताच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या सौर आघाडीला अमेरिकेनेही पाठिंबा दिला आहे. स्कॉटलंड मधील ग्लासगो येथे सुरू असलेल्या वातावरण बदल विषयक आंतरराष्ट्रीय परिषदेने या आघाडीला आपला पाठिंबा दर्शवला आहे.
या आठवड्याच्या प्रारंभी झालेल्या “वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रीड’ या शिर्षकाखाली झालेल्या “ग्रीन ग्रीड इनिशिएटिव्ह’च्या सुकाणू समितीच्या बैठकीमध्ये अमेरिकेच्या पर्यावरण मंत्री जेनिफर ग्रॅनहोल्म यांनी या पुढाकाराला अमेरिकेचा पाठिंबा असल्याचे सांगितले.
मानवाकडून दरवर्षाला जेवढी उर्जा वापरली जाते तेवढी उर्जा सूर्याकडून दर तासाला मानवाला उपलब्ध होत असते, असे ग्रॅनहॅम म्हणाल्या. या सूकाणू समितीला दोन अतिमहत्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करायचे आहे. मानवाकडून वापरल्या जाणाऱ्या एकूण उर्जेचा वापर आणि सौर उर्जेची उपलब्धता सर्वाधिक प्रमाणात वापरली जाणे हे ते दोन मुद्दे आहेत, असे त्या म्हणाल्या.
भारताच्या अधयक्षतेखालील सौर आघाडी आणि “कॉप-26′ मधील ब्रिटनच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय वातावरण बदल शिखर परिषदेतील या सूकाणू समितीची स्थापना मंगळवारी करण्यात आली. या सूकाणू समितीमध्ये भारताव्यतिरिक्त ब्रिटन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्स हे सदस्य देश आहेत. या आघाडीच्या माध्यामातून सौर उर्जेचा योग्य विनियोग करण्यासाठी 80 देशांनी तयारी दर्शवली आहे. या आघाडीचे दिशादर्शन करण्याची जबाबदारी या सूकाणू समितीकडे आहे. सौर उर्जेबाबतचा जाहिरनामा या आघाडीकडून प्रसिद्ध केला जाणेही अभिप्रेत आहे.
सौर उर्जेचा वापर वाढवण्यासाठी सोलर पॅनेल आणि ग्रीडचा वापर वाढवण्यासाठी “नेक्स्ट जनरेशन टेक्नोलॉजी’च्या वापरावर अमेरिका लक्ष केंद्रीत करणार आहे. याशिवाय सौर उर्जेच्या वापराने विद्युत निर्मिती करणे ज्या देशांना शक्य नाही, त्यांनाही अमेरिका मदत करणार आहे, असेही घ्रॅनहोल्म म्हणाल्या.
तर या सूकाणू समितीने निश्चित केलेल्या कार्यक्रमांचे यशापयश ग्रीडच्या विस्तारावर अवलंबून आहे. त्यासाठी सौर उर्जेसाठी योग्य गुंतवणूक आवश्यक आहे, असे आंतरराष्ट्रीय सौर उर्जाविषयक आघाडीचे महासंचालक डॉ. अजय माथुर यांनी सांगितले.
वातावरण बदल विषयक उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी एकमत निर्माण करणे आणि कृती आराखडा निश्चित केला जावा यासाठी ग्लासगो येथे नेतृत्व पातळीवरील चर्चा अव्याहतपणे सुरू आहेत. या परिषदेची सांगता 12 नोव्हेंबर रोजी होणार आहे.