न्यूयॉर्क :-सर्वियन 36 वर्षीय जोकोविच सातव्यांदा यूएस ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. शेल्टनविरुद्धचा सामना हा या ग्रॅंडस्लॅम स्पर्धेतील त्याचा 100 वा सामना होता. जोकाविचने जर सोमवारी फायनल सामना जिंकला तर तो टेनिसच्या इतिहासात यूएस ओपन जिंकणारा सर्वांत वयस्कर खेळाडू ठरणार आहे.
यासह, जोकोविचला मार्गारेट कोर्टच्या पुरुष आणि महिलांमध्ये सर्वाधिक ग्रॅंडस्लॅम जिंकण्याच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी असेल. आपल्या 24व्या ग्रॅंडस्लॅम विजेतेपदासाठी जोकोविच कोर्टवर उतरणार आहे.
विशेष म्हणजे जोकोविचने त्याच्या शेवटच्या 23 ग्रॅंडस्लॅम उपांत्य फेरीतील 22 सामने जिंकलेले आहेत. त्याने अखेरचे यूएस ओपनचे विजेतेपद 2018 मध्ये जिंकले होते.
दृष्टीक्षेपात
– जोकोविच सातव्यांदा यूएस ओपनच्या अंतिम फेरीत
– जोकोविचला जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर येण्याची संधी
– जोकोविच तिसऱ्यांदा एकाच वर्षी चारही मोठ्या स्पर्धांच्या अंतिम फेरीत
– चौथ्यांदा एकाच मोसमात तीन ग्रॅंडस्लॅम जिंकण्याचा जोकोविचचा प्रयत्न
दरम्यान,अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात रशियाचा अव्वल टेनिसपटू डॅनिल मेदवेदेवने जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावरील गतविजेत्या स्पॅनिश कार्लोस अल्काराझला पराभवाचा धक्का देताना अंतिम फेरीत धडक मारली.तर जोकोविचने उपांत्य फेरीत अमेरिकेच्या बेन शेल्टनचा 6-3, 6-2, 7-6 असा सलग सेटमध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. जोकोविच-मेदवेदेव यांच्यात सोमवारी(ता.11) रोजी अंतिम सामना रंगणार आहे.