मुंबई – अंधेरीतील साकिनाका येथे शनिवारी एका पाच मजली इमारतीमध्ये भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली. यावेळी आगीत अडकून पडलेल्या 33 रहिवाशांची मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवाची बाजी लावून सुखरूप बाहेर काढल्याने मोठी जीवितहानी टळली. अन्यथा अनर्थ ओढवला असता.
अंधेरी (प.), साकिनाका, डिसुझा कंपाऊंड येथील साकी को. ऑप. हौ. सोसायटीच्या तळमजला व पहिल्या मजल्यावर भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत इलेक्ट्रिक मिटर केबिन, इलेक्ट्रिक वायरिंग, उपकरणे, पॅनलबोर्ड आदींना आग लागली होती. या आगीचा धूर इमारतीमध्ये सर्वत्र पसरला होता.
आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच, एका बाजूला आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान फायर इंजिन व वॉटर टॅंकर यांच्या साहाय्याने अथक प्रयत्न करीत होते. दुसरीकडे, अग्निशमन दलाच्या जवानांनी शिडीच्या साहाय्याने इमारतीमध्ये अडकलेल्या रहिवाशांना धीर देत, पहिल्या मजल्यावरील 7 जणांना, दुसऱ्या मजल्यावरून 16 जणांना सुखरूपपणे बाहेर काढून वाचवले. तसेच, तिसऱ्या मजल्यावर अडकलेल्या 10 रहिवाशांना म्हणजे एकूण 33 रहिवाशांना अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून वाचविले. त्यामुळे रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.