लाहोर: करोना संकटासाठी जगातील अनेक देश चीनला जबाबदार ठरवत आहेत. मात्र, पाकिस्तानात करोना फैलावाचा ठपका अमेरिकेवर ठेवला जात आहे. त्यातून एका पाकिस्तानी नागरिकाने चक्क न्यायालयात धाव घेऊन अमेरिकेविरोधात याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेत 20 अब्ज डॉलर्स भरपाईची मागणी करण्यात आली आहे.
पाकिस्तानच्या लाहोरमधील करोनाबाधित रहिवासी रझा अली याने स्थानिक न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अमेरिकेला करोना उद्रेकावर नियंत्रण ठेवता आले नाही. त्यामुळे त्या विषाणूचा फैलाव पाकिस्तानसह जगभरात झाला. त्यातून जगभरात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली.
त्याशिवाय, आर्थिक संकट निर्माण झाले. माझ्या कुटूंबातील सदस्यही त्यामुळे प्रभावित झाले आहेत. यापुढे त्यांना आरोग्यदायी जीवन जगणे मुश्किल आहे. त्या बाबींचा विचार करून करोना संकट अमेरिकेमुळे निर्माण झाल्याचा आदेश न्यायालयाने द्यावा, असे साकडे याचिकेत घालण्यात आले आहे. संबंधित याचिका विचारात घेऊन न्यायालयानेही इस्लामाबादमधील अमेरिकी दूतावास आणि परराष्ट्र मंत्रालयाला नोटिसा बजावल्या आहेत. संबंधित प्रकरणात पुढील सुनावणी 7 ऑगस्टला होणार आहे.