वॉशिंग्टन – रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जी लावरोव्ह भारत दौऱ्यावर आले असताना भारत आणि रशियादरम्यानच्या व्यवहारांना प्रोत्साहन दिले जणार आहे. त्यामुळे रशियावर घातलेल्या निर्यात विषयक निर्बंधांना डावलून रशियाशी व्यवहार केल्याबद्दल अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाने भारतावर नाराजी व्यक्त केली आहे. सुरक्षिततेच्या मुद्यावरून असलेल्या भागीदारांमध्ये आता मतभेद निर्माण होत असल्याची चिन्हे दिसायला लागली आहे.
आता इतिहासाच्या योग्य बाजूने उभे राहण्याची वेळ आली आहे. युक्रेनच्या नागरिकांचे स्वातंत्र्य, सार्वभौमत्व आणि लोकशाही जपण्यासाठी अमेरिका आणि डझनभर अन्य देशांच्या बाजूने उभे राहण्याची वेळ आली आहे. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्या युद्धखोरीला मदत होईल, अशा भूमिकेत उभे राहता कामा नये, असे अमेरिकेच्या वाणिज्य सचिव गिना रायमोंडो यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.
ऑस्ट्रेलियाचे व्यापार मंत्री डॅन टेहान यांनीही हिंद – प्रशांत क्षेत्रातील चीनच्या वाढत्या आक्रमकतेला आळा घालण्यासाठी सर्व लोकशाही देशांनी एकत्र राहण्याचे आवाहन केले आहे. या हिंद प्रशांत क्षेत्रात अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारताचाही समावेश होतो. रशियाकडून सर्वात जास्त खरेदी भारत करतो आहे. रशियाकडून स्वस्तातील तेलाची खरेदी भारताने करायची तयारी केली आहे.
जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा गेल्या महिन्यात भारतात येऊन गेले. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनीही व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अन्टनी ब्लिंकेन यांनीही जयशंकर यांच्याशी युक्रेनमधील बिघडलेल्या परिस्थितीबाबत चर्चा केली आहे.