नगर – नगर अर्बन बॅंकेतील 150 कोटींच्या घोटाळा प्रकरणाचा गुन्हा तीन दिवसांपूर्वी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर आता या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषणकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.
नगर अर्बन बॅंकेमध्ये अनेक आर्थिक घोटाळे उघडकीला आले. या अगोदर कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. पुणे येथे आर्थिक घोटाळा संदर्भात एक गुन्हा दाखल झाला आहे. या सर्व प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे.
बॅंकेच्या अन्य कागदपत्रांची पडताळणीही पोलीस करत आहेत. या अगोदरचे जे घोटाळे उघड झाले होते व जे गुन्हे दाखल झाले होते, ते सर्व आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आले आहेत. नगर अर्बन बॅंकेत प्रशासक नियुक्त झाल्यानंतर शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये सोने तारण संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास देखील आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात आलेला आहे.
तीन दिवसांपूर्वी कोतवाली पोलीस ठाण्यांमध्ये नगर अर्बन बॅंकेच्या 150 कोटी रुपयांचा घोटाळ्याचा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींमध्ये बॅंकेच्या तत्कालीन संचालक मंडळासह इतर संस्थांचा समावेश आहे. दाखल करण्यात आलेला 150 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा गुन्हा बॅंकेचे सभासद तसेत माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दाखल करण्यात आला आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर मंगळवारी हा गुन्हा आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.