नागपूर – ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचा बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबतचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तर ठाकरे गटातील नेत्याचे बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध असल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत केल्यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली. या आरोपानंतर सुधाकर बडगुजर यांनी या आरोपांचे खंडन केले होते.
आता याप्रकरणी त्यांची सध्या एसआयटी चौकशी सुरू आहे. असे असले तरी सुधाकर बडगुजर यांच्यावर आरोप केल्यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गिरीश महाजन यांचा एक फोटो माध्यमांना दाखवत त्यांच्यावर आरोप केले होते. याच फोटोवरून आज (18 डिसेंबर) विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले.
विधान परिषदेत विरोधी पक्षाने 289 प्रस्ताव मांडत सलीम कुत्ता प्रकरणावर चर्चेची मागणी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी एक फोटो दाखवत (गिरश महाजन यांचा फोटो) चौकशीची मागणी केली. तसेच त्यांना एसआयटी चौकशीला बोलण्यात न आल्याचा मुद्दा उपस्थित केला.
यानंतर अनिल परब आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही सलीम कुत्ता प्रकरणी आक्रमक होत चौकशीची मागणी केली. मात्र विरोधकांनी 289 प्रस्ताव मांडत असताना कुठल्याही नेत्याचे नाव दिले नव्हते, असे असतानाही त्यांनी गिरीश महाजन यांचे नाव घेतल्यामुळे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी त्यांचा प्रस्ताव फेटाळला आहे. यानंतर राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सरकारची बाजू मांडत विरोधकांवर निशाणा साधला.