US President Joe Biden – अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन (Joe Biden) यांच्या वाहनांच्या ताफ्यामध्ये आज एक कार घुसली. वाहनांच्या ताफ्यातील एका कारला या एसयूव्हीची धडक बसली. त्यामुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र अध्यक्ष बायडेन आणि त्यांच्या पत्नीला या अपघातात कोणतीही इजा झाली नाही. या दाम्पत्याला तातडीने तेथून दूर हटवण्यात आले. ही घटना विलिंग्टनमधील डेलावेअर भागात रविवारी संध्याकाळी घडली.
बायडेन आणि उपाध्यक्षा कमला हॅरिस यांच्या मुख्यालयातून बाहेर पडत असताना त्यांच्या वाहनांच्या ताफ्यातील एक कार जवळच असलेल्या एका एसयूव्हीला धडकली. त्यामुले वाहनांचा ताफा काही काळ खोळंबला. या गोंधळामुळे सुरक्षा रक्षकांची धावपळ झाली आणि त्यांनी तातडीने अध्यक्ष बायडेन आणि फर्स्ट लेडीच्या कारला सुरक्षा कवच दिले.
काही सुरक्षा रक्षकांनी तर धडक देणाऱ्या कारच्या चालकावर बंदुकाही रोखल्या. या चालकाने त्वरित हात वर करून आपली चूक मान्य केली आणि आपली कार मागे घेतली. त्यानंतर बायडेन यांची कार मार्गस्थ झाली. तर धडक बसलेल्या कारच्या चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले गेले. मात्र यामुळे अमेरिकेच्या अध्यक्षांच्या सुरक्षेत त्रुटी राहून गेल्याचे स्पष्ट झाले.