हडपसर : पुणे शहर तसेच उपनगरांतील रस्त्यांवर प्रदूषणात घट होण्यासाठी आणि पर्यावरणपूरक पर्यायांना प्रोत्साहन देण्यासाठी इलेक्ट्रिक बसेस जास्त प्रमाणात वापरात आणण्याचे महापालिका, पीएमपीचे धोरण आहे. परंतु, अशा बसेस तातडीने चार्जिंग होणेही गरजेचे आहे. याच करणातून किल्ले सिंहगडावर सुरू करण्यात आलेली ई-बस सेवा स्थगित करावी लागली होती. याच पार्श्वभूमीवर अशा ई-बसेससाठी मांजरी बुद्रुक- शेवाळेवाडी येथील पीएमपीच्या बस डेपोत इलेक्ट्रिक बसेससाठी अत्याधुनिक “चार्जिंग स्टेशन’ उभारण्यात येत आहे. तसेच इलेक्ट्रिक बसेस बरोबरच खासगी ई-वाहनांनाही याठिकाणी चार्जिंग करता येईल, असे नियोजन आहे.
शहर आणि उपनगरात इलेक्ट्रिक बसेस धावत आहेत, लवकरच त्यांची संख्या वाढणार आहे. त्यातील अधिकाधिक बसेस या उपनगरांत धावणार आहेत. अशा बसेस केवळ अर्ध्या तासात चार्जिंग कशा करता येतील यासाठी अद्ययावत असे “चार्जिंग स्टेशन’ शेवाळेवाडी येथील डेपोत उभारण्याचे नियोजन आहे. ई-बस येथे प्रवासी घेण्यासाठी किंवा सोडण्यासाठी येतील त्या मधल्या केवळ अर्धा तास एवढ्या वेळात बस पूर्ण चार्जिंग होईल, असे चार्जिंग स्टेशन उभारण्यात येईल. याशिवाय खासगी वाहनांनाही येथे आपले ई-वाहन चार्जिंग करता येईल का, असेही नियोजन आहे. पालकमंत्री अजित पवार आणि आमदार चेतन तुपे यांच्या निधीतून हा प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न आहे.
ई-बस चार्जिंगची व्यवस्था भेकराईनगर डेपोत आहे. मात्र ती तोकडी आहे. भविष्यात आणखी ई-बस दाखल होणार असल्यामुळे चार्जिंगसाठीच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी पीएमपीने पुढाकार घेतला आहे. अशी कल्पना पीएमपीचे माजी अध्यक्ष डॉ. राजेंद्र जगताप यांनी आपणांस दिली होती, याशिवाय पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांनीही शेवाळेवाडी-मांजरी बुद्रुक येथील बस डेपोत चार्जिंग स्टेशन उभारण्यात यावे यासाठी प्रयत्न केले आहेत. लवकरच निधी उपलब्ध करून याठिकाणी चार्जिंग स्टेशनचा एक पथदर्शी प्रकल्प पीएमपीच्या बसेस बरोबरच खासगी ई वाहनचालकांना उपलब्ध करण्याचे प्रस्तावित आहे.
– चेतन तुपे पाटील, आमदार, हडपसर विधानसभा