गोंडा, (उत्तर प्रदेश) – उत्तर प्रदेशातील गोंडा मतदारसंघातील समाजवादी पार्टीच्या उमेदवाराविरोधात बलात्कार आणि महिलेला मारहाण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज मतदानाला सुरुवात होण्यापूर्वीटच हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गोंडा येथील सपाचे उमेदवार यांच्यासह त्यांचे बंधू आणि अन्य समर्थकांवरही हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश प्रताप सिंह आणि त्यांचे समर्थक एका महिलेच्या घरात घुसले आणि त्यांनी या महिलेला आणि घरातील भाजपचे समर्थक असलेल्या अन्य सदस्यांना मारहाण केली, असे पोलिसांनी म्हटले आहे. यावेळी ही महिला घरात स्वयंपाक करत होती. सिंह आणि त्यांच्या समर्थकांनी भांडणाला सुरुवात केली.
घरातील अन्य सदस्यांनी विरोध केल्यावर त्यांना मारहाण करण्यात आली. या कार्यकर्त्यांनी या महिलेवर बलात्कार केला आणि तिच्या गळ्यातील सोन्याचे नेकलेसही हिसकावून घेतले, अशी तक्रार पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणी दोघाजणांना ताब्यात घेण्यात आले आहे, असे पोलीस अधिक्षक संतोष कुमार मिश्रा यांनी म्हटले आहे. सिंह आणि त्यांच्या घराभोवती पोलीस तैनात करण्यात आले असून भाजप उमेदवार अजय कुमार सिंह यांनाही सुरक्षा देण्यात आली आहे, असेही पोलिसांनी सांगितले.