कराड/ ढेबेवाडी -कराड तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ हवा असली तरी पाऊस हुलकावणी देत आहे. पाटण तालुक्यातील वांग खोऱ्यात मात्र अवकाळी पावसामुळे ओढे- नाले तुडुंब भरून वाहिले. हा पाऊस शेतीला पूरक असल्याने शेतकरीवर्गातून आनंद व्यक्त होत आहे. शनिवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यामुळे कराड व पाटण तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस होणार अशी शक्यता वर्तवली जात होती. पाटण तालुक्यात दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक ढग दाटून येऊन अवकाळी पावसाने झोडपून काढले. तर कराड तालुक्याला पावसाने हुलकावणी दिली.
कराड तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. मात्र, पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या आठवड्यात पडलेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील शेतकऱ्यांनी मशागतीच्या कामांना सुरूवात केली आहे. त्यामुळे आता जोरदार पावसाची गरज आहे. मात्र, कराड तालुक्यात तीन दिवसांपासून फक्त ढगाळ वातावरण आहे. वारे वाहत असल्याने वातावरणात थंडावा जाणवत आहे. मशागतीच्या कामात व्यस्त असलेल्या शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे.
दरम्यान, पाटण तालुक्यात शनिवारी दुपारी अचानक ढग दाटून येऊन वादळी वाऱ्यासह पावसास सुरूवात झाली. यावेळी गाराही पडल्याने मुलांनी त्याचा आनंद लुटला. वांग खोऱ्यात सुमारे एक तास अवकाळी पाऊस पडत होता. या पावसाने सर्व ओढे- नाले तुडुंब भरून वाहत होते. तसेच शेतामध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. शेतीची पेरणीपूर्व मशागत व शेतीची कामे करण्यासाठी पूरक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त होत होता. तालुक्यातील अनेक गावांत पाणी टंचाई जाणवत आहे. मात्र, या पावसाने थोडाफार प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे.