पुणे – भारतीय हवामान विभागाने 6, 7 आणि 8 मार्च रोजी राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यानुसार राज्यात विविध ठिकाणी पाऊसाने हजेरी लावली आहे. पुणे शहरातही सोमवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. यावेळी होळी सण साजरा करताना नागरिकांची धावपळ झाल्याचे पाहायला मिळाले.
पुणे शहरातील मध्यवर्ती भाग सदाशिव पेठ, नारायण पेठ यांसह विविध भागात पाऊस बरसला. तसेच मावळात गारपीट झाली आहे. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील धरणगाव शहरासह ग्रामीण भागात रविवारी अवकाळी पावसाने मेघगर्जनेसह हजेरी लावली होती. यावेळी गारखेडा रोडवरील एका शेतात वीज कोसळून नारळाचे झाड पेटले. या आगीत झाड पूर्णपणे जळून खाक झाले. सुदैवाने घटनास्थळी कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. तसेच नाशिकमध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले गव्हाचे पिक आडवे झाले आहे. 8 मार्चपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.