- आयटी कर्मचाऱ्यांवर वरिष्ठांची वक्रदृष्टी
चिखली – पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात मागील दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने ऑनलाइन अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थी आणि शिक्षकांची अभ्यासक्रम पूर्ण करताना तारांबळ होत आहे. तसेच आयटी आणि सेवा क्षेत्रातील वर्क फ्रॉम होम ड्युटीतील लाखो कर्मचाऱ्यांना वरिष्ठांची वक्रदृष्टीचा सामना करावा लागत आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने महावितरणच्या भोसरी येथील विभागीय कार्यालयाला निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, विजेच्या लपंडावामुळे हजारो सोसायट्यांना पाणीपुरवठा वेळेवर ना झाल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. सतत खंडित होणाऱ्या वीजपुरावठ्यामुळे लघुउद्योगांचे आर्थिक नुकसान होत आहे. सामान्य जनता, मध्यम वर्ग, उद्योजकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
विद्यापीठाची अंतिम परीक्षा 12 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या परीक्षेच्या काळात महावितरणची सेवा विस्कळीत झाली तर विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. गेल्या तीन वर्षांत 18 टक्क्यांहून अधिक वीजदरवाढ लादणाऱ्या महावितरणने स्वतःच्या ग्राहकसेवेचा दर्जा का सुधारला नाही? अखंडित वीजपुरवठा सुरू करून ग्राहकांच्या अडचणी एका आठवड्यात सोडवा अन्यथा माकप पिंपरी-चिंचवड शहर समितीच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
गणेश दराडे, बाळासाहेब घस्ते, अपर्णा दराडे, क्रांतिकुमार कडुलकर, सचिन देसाई, वीरभद्र स्वामी, सुकुमार पोन्न्पन, सतीश नायर, अविनाश लाटकर, किसन शेवते, विनोद चव्हाण, संतोष गायकवाड, ख्वाजा जमखाने, संजय ओहोळ या वेळी उपस्थित होते.