- वीकेंडला निर्बंध कायम
- उद्यापासून सलून, जीम, उद्याने, हॉटेल उघडणार
पिंपरी – पुणे पाठोपाठ पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही “अनलॉक’ जाहीर केले आहे. त्यानुसार आता शहरातील सर्व दुकाने सायंकाळी चार वाजेपर्यंत उघडण्यास मुभा देण्यात आली आहे. असे असले तरी पाच वाजल्यानंतर शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. याबाबत आयुक्त राजेश पाटील यांनी आदेश काढले आहेत.
सोमवारपासून या नियमांची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे. त्यानुसार शहरातील सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. तसेच वित्तीय संस्था, बॅंका यांनाही आठवडाभर काम करता येणार आहे. राज्य सरकारच्या वतीने पाच टप्प्यांत “अनलॉक’ची प्रक्रिया करण्यात आली आहे. त्यासाठी शहरातील “पॉजिटीव्हीटी’ दर व रुग्णालयांतील बेडची उपलब्धता याचा आधार घेण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णवाढीचा दर हा 5.8 टक्के आहे. तर ऑक्सिजन बेडची उपलब्धता 15.91 टक्के इतकी आहे. तसेच शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्याही सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे शहरात “अनलॉक’च्या प्रकियेस सुरूवात करण्यात आली आहे.
शहरात अत्यावश्यक सेवेअंतर्गत यापूर्वी सूट देण्यात आलेल्या सर्व आस्थापना सुरू राहणार आहेत. त्यामध्ये किराणा, भाजीपाला, फळविक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई, सर्व खाद्यपदार्थाची दुकाने, मटन, चिकन, अंडी, मासे विक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहे. तर या व्यतिरिक्त केंद्र व राज्य स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये, बॅंका, विमा कंपन्या, सर्व मायक्रो फायनान्स संस्था, वकील, सीए यांची कार्यालये, वित्तीय संस्थेशी संबंधित कार्यालये सुरू ठेवता येणार आहे. अत्यावश्यक दुकाना व्यतिरिक्त अन्य दुकाने सोमवार ते शुक्रवार सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहे. शहरातील कोचिंग क्लासला मात्र परवानगी देण्यात आली नाही.
काय सुरू
1) रेस्टॉरेट, बार, फूड कोर्ट हे सोमवार ते शुक्रवार सायंकाळी चार वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. त्यानंतर तसेच शनिवार व रविवार फक्त घरपोच सेवा रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवता येईल.
2) महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणे, उद्याने, खुली मैदाने, चालणे व सायकलिंग आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत सुरू राहतील.
3) सामाजिक, धामिक कार्यक्रमास 50 लोकांची उपस्थितीती ग्राह्य राहिल, हे कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार सायंकाळी चारपर्यंत घ्यावेत. लग्नासाठी 50, अंत्यसंस्कार व दशक्रिया विधीसाठी 20 लोकांच्या उपस्थितीस परवानगी असेल.
4) शहरातील व्यायामशाळा, जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र याठिकाणी वातानुकूलित यंत्रणा वापरता येणार नाही.
5) मद्यविक्रीची दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील, शनिवार व रविवारी घरपोच सुविधा देता येईल.